पान:नवे शिक्षण, नवे शिक्षक (Nave Shikshan , Nave Shikshak).pdf/72

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

पोरके होत आहे. जीवन जगण्याचा संघर्ष पाहता विद्यमान शिक्षण त्याच्याशी दोन हात करण्याची क्षमता व कौशल्य देत नसल्याने शिक्षणात एक प्रकारची पोकळी निर्माण झाली आहे. शिक्षणातील वाढती भाषिक औपचारिकता, भाषेची काठिण्य पातळी शिकण्यातला मोठा अडथळा ठरत आहे. मूल्यमापनाची सदोष पद्धत प्राथमिक स्तरावर गळती व स्थगितीचे कारण ठरत आहे.
 त्यामुळे आजही जगात शाळा सोडण्याचे प्रमाण चिंताजनक आहे. आज जगात ३१ दशलक्ष मुले प्रतिवर्षी शाळा सोडतात व तितकीच नापास होऊन त्याच वर्गात बसतात. हे चित्र पाहिले की आपल्या शिक्षण पद्धतीची सदोषता लक्षात आल्यावाचून राहत नाही. शिक्षणाची पायरीच न चढणाऱ्या मुली घरोघरी अशिक्षित माता घडवण्याचेच पर्यवसान बालमृत्यू, अनारोग्य, संस्कारअभावादी प्रश्न निर्माण करतात. आई शिकलेली असेल तर बाल्य व बालपण निरोगी व संस्कार संपन्न होण्यास मदत होते. ग्रामीण भागातील शिक्षण वंचित मुले शहरापेक्षा दुप्पट असण्याचं हे गूढ कारण होय.
शिक्षणातील अर्थकारणाचा बाजार
 शिक्षण व्यवसायापलीकडे जाऊन त्याला बाजारी, ओंगळ स्वरूप येण्यात शिक्षणाचे अर्थकारण जबाबदार आहे. शिक्षणात मूल्यांची जागा किमतीने घेणे यातून ते स्पष्ट होते, 'सर्वांसाठी शिक्षण' हे स्वातंत्र्याचे आपले एक ध्येय होते, म्हणून आपण शिक्षणाच्या सार्वत्रिकरणाचे धोरण अंगिकारले होते. यातूनच आपण सन २००९ ला ६ ते १४ वयोगटातील बालकांसाठी सक्तीच्या मोफत शिक्षणाचा कायदा केला. देशातले प्रत्येक मूल शिकावे म्हणून आपण कायद्याने शिक्षक व पालकांना त्यात जबाबदार घटक बनवले. ही गोष्ट चांगलीच आहे, शिक्षणमान वाढावे, सकारात्मकता रुजावी म्हणून परीक्षेऐवजी निरंतर मूल्यांकन नीती अवलंबिली.
 पण दुसरीकडे विना अनुदानित शिक्षण संस्कृतीस महाद्वार उघडे करून दिल्याने शिक्षण ही धनदांडग्यांची मक्तेदारी बनली. वर्गरहित समाजाचे स्वप्न धुळीला मिळाले. शिक्षणात नवा वर्णाश्रम रुजला. 'पैसा असेल तो शिकेल' अशा विषमता समर्थक धोरणामुळे शिक्षणाची दुकानदारी फोफावली. महाग शिक्षणाने फक्त महाग सुविधा निर्माण केल्या. सकस व गुणवत्ता प्रधान शिक्षण व्यवस्था आपण निर्माण करू शकलो नाही. मुले

नवे शिक्षण, नवे शिक्षक/७१