पान:नवे शिक्षण, नवे शिक्षक (Nave Shikshan , Nave Shikshak).pdf/71

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

लागू पडते. आपण जर आपले अभ्यासक्रम, वर्षानुवर्षे बदलत नसू तर आपले शिक्षण कालबाह्य व कुचकामीच राहणार. आज सर्वत्र 'नेते मागे अनुयायी पुढे' असे चित्र आहे. शिक्षण क्षेत्रात विद्यार्थी तंत्रज्ञानात कुशल तर शिक्षक संगणक निरक्षर, असे जे चित्र आहे, ते शिक्षक स्वत:स स्वयंप्रेरणेने अद्यतन करत नाहीत म्हणून. डी.एड्. बी.एड. होऊन लागलेला शिक्षक एम.एड, होतो असं अपवादाने दिसते. नोकरीतील सेवा शाश्वती, वर्षाकाठी काही न करता आपोआप वेतनवाढ, संप केला की नवे, चढे वेतनमान, वरिष्ठतेने पदोन्नती या नि अशा अतिरिक्त सुरक्षेने शिक्षकांत अध्ययन, वाचन, लेखन, संशोधन, कृती प्रकल्प, नवोपक्रम इत्यादीच्या ऊर्जाच निर्माण होत नाहीत. जे नवे, उत्साही शिक्षक येतात त्यांना जुने जाणतेपणाने नामोहरम करतात. शिक्षण क्षेत्रात आज खरी गरज आहे, ती मरगळ दूर होण्याची. शासनास जाग येवो न येवो, शाळा टिकली तर मी टिकणार या जाणीव-जागृतीने शिक्षक काही करू मागेल, धजेल तरच वर्तमान स्थितीस छेद देता येईल.
 शिक्षण क्षेत्रातील गुणवत्तेस ग्रहण लागण्याची अनेक कारणे आहेत. त्यात शिक्षकाची खालावलेली गुणवत्ता हेही एक कारण आहे. शिक्षक ही वृत्ती आहे, ती केवळ औपचारिक पात्रतेने निर्माण होत नाही. तुमच्यात विद्यार्थ्यांमध्ये शिकण्याची इच्छा व जिज्ञासा निर्माण करायचे कौशल्य असेल तरच तुम्ही चांगले शिक्षक होऊ शकता. आज चांगले वेतनमान मिळते म्हणून या व्यवसायाकडे धाव घेणारे शिक्षक; त्यांच्यात व्यवसायविषयक न समर्पण आढळते, न अध्यापनाविषयी गोडी. पाट्या टाकणारे शिक्षक रस्त्यावर पाट्या टाकणाच्या मजुरापेक्षा वेगळे असत नाही. वाचन, व्याख्यान, समाजशीलता, बुद्धिप्रामाण्य, संशोधन वृत्ती, व्यासंग या शिक्षकाच्या आदर्श कसोट्या लावता येईल अशा व्यक्ती शिक्षणात अत्यल्प आढळतात. त्यातूनही हा व्यवसाय धंदा होऊ लागला आहे. शिक्षणाच्या बाजारीकरणाचे ते एक प्रमुख व गंभीर कारण आहे.
 आज जी पाठ्यपुस्तके तयार होतात त्यात उद्दिष्टानुवर्ती आशय संपन्नता अभावाने आढळते. त्यामुळे शिकण्याची गोडी विद्यार्थ्यांत तयार होत नाही, मूल शाळेला जाताना रडते. यातून मिळणारा संदेश विचार करण्यासारखा आहे किंवा महाविद्यालयीन पातळीवर विद्यार्थी तास का चुकवतात? याचाही विचार व्हायला हवा. पाया भुसभुशीत राहण्याने कळस झगझगीत होत नाही हे आपण समजून घेतले पाहिजे. आज घरे भौतिक समृद्ध आहेत पण भावनिक नाते संबंधांना ओढ लागल्याने बाल्य

नवे शिक्षण, नवे शिक्षक/७०