पान:नवे शिक्षण, नवे शिक्षक (Nave Shikshan , Nave Shikshak).pdf/65

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

सुधारणांचे वारे वाहू लागले. सुधारकांची एक मोठी परंपरा महाराष्ट्रात निर्माण झाली, त्यातून शिक्षण व पत्रकारिता विकसित झाली. शिक्षणास गती आली. राष्ट्रीय शिक्षण पद्धतीचा पुरस्कार करत दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर, लोकहितवादी गो. ह. देशमुख, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, महात्मा ज्योतिराव फुले, गोपाळ गणेश आगरकर, लोकमान्य टिळक प्रभृती मान्यवरांनी शाळा, संस्था, कॉलेजीस सुरू करून स्वातंत्र्यपूर्व काळात समाजहिताच्या भावनेने शिक्षण प्रसाराचे कार्य केले. याच काळात मिशनरी शिक्षण संस्थाही सुरू झाल्या पण त्यांचा भर धर्म शिक्षण व प्रसारावर होता. सन १८५० च्या दरम्यान सर्वत्र इंग्रजी शिक्षणाच्या शाळा सर्रास सुरू झालेल्या आढळतात. १९२० ला गांधी युग सुरू झाल्यावर मूलोद्योगी शिक्षणाची संकल्पना रूढ झाली. सन १९६० ला महाराष्ट्र राज्य स्वतंत्र झाले तरी विदर्भ, मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्र सर्वत्र समान शिक्षणाचे धोरण १०+२+३ आकृतीबंधाद्वारे मात्र १९७२ ला सुरू झाले.
नव्या आकृतीबंधाचे परिणाम :
 नव्या आकृतीबंध व अभ्यासक्रमानुसार सन १९७७ ला नवशिक्षित तरुणांची पहिली तुकडी उच्च शिक्षण घेण्यासाठी म्हणून प्रवेशेच्छु झाली. हे पाल्य अशा पालकांची अपत्ये होती ज्यांचे विवाह स्वातंत्र्याच्या आरंभी (१९४७-५०) झाले होते. पालक म्हणून त्यांच्या शिक्षणविषयक आकांक्षा स्वातंत्र्यामुळे उंचावल्या होत्या. कारण ही पालकांची पिढी आर्टस्, कॉमर्स पदवीधरांची होती, त्या काळात डॉक्टर, इंजीनिअर, बँक अधिकारी होणे प्रतिष्ठेचे मानले जायचे. प्रत्येक पालकाला आपला मुलगा/मुलगी डॉक्टर, इंजीनिअर व्हावे असे वाटायचे. पण त्या काळात इंजीनिअर व मेडिकल कॉलेजीस हाताच्या बोटावर मोजता येईल इतकीच होती व तीही शासकीय. तेथील प्रवेश क्षमता मर्यादित. तिथेही आरक्षण पद्धती प्रवेशासाठी लागू झाल्याने मागणी अमर्याद व प्रवेश मर्यादित असे चित्र निर्माण झाले होते. निराश पालकांनी शेजारच्या कर्नाटक प्रांताकडे आपला मोर्चा वळवला. कारण तुलनेने तिथे जागा अधिक व संख्याही अधिक होत्या. लोक देणग्या देऊन प्रवेश मिळवू लागले, तशी महाराष्ट्रातील पैसा कर्नाटकात जाऊन तो प्रांत समृद्ध होतो अशी हाकाटी सुरू झाली आणि इकडे तर मेडिकल, इंजीनिअरिंग कॉलेजीस उभारणीसाठी लागणारा पैसा शिक्षणात घालावा, गुंतवावा अशी शासनाची मानसिकता व तयारी नव्हती.
विना अनुदान धोरणाची फलनिष्पती :
 या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा

नवे शिक्षण, नवे शिक्षक/६४