पान:नवे शिक्षण, नवे शिक्षक (Nave Shikshan , Nave Shikshak).pdf/62

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

जीवशास्त्रीय आधार व अधिष्ठान आहे. कधी काळी माणसाचे मूल्य हे बुद्ध्यांकावर मोजले, तोलले जायचे. मनुष्य जसा यंत्र बनत चालला तसा बुद्ध्यांकाबरोबर त्याचा भावनिक सूचकांक (Emotional Quotient) महत्त्वाचा बनला. तरलता ही स्त्रिची उपजत देणगी आहे. तिचं हे बलस्थान शिक्षणाद्वारे विकसित होईल तर जग भविष्यातील अनेक संकटातून वाचेल. म्हणून शिक्षणात स्त्रिच्या संवेदना सूचकांकाचा विचार होणे आवश्यकच नाही, तर अनिवार्य आहे. स्त्रिच्या संवेदनशीलतेवर घराचे घरपण, समाजाची एकता व राष्ट्रीय ऐक्य अवलंबून असते, हेही या संदर्भात आपण लक्षात घ्यायला हवे.
संवाद कौशल्य
 जागतिकीकरणाने तंत्रज्ञान युगाचे वरदान दिले. त्यामुळे हितगुज ही कौटुंबिक गरज न राहता वैश्विक आवश्यकता बनली. स्त्रिचे वाढते समाज संपर्क, वावर, व्यवहार यात अबोल स्त्रीचे रुपडे मागे पडून ती संवादिनी, समुपदेशक, सल्लागार, सहयोगी बनत विकसित होते आहे. कधी काळी साहाय्यक स्त्री आता नेतृत्व, निर्माती, सर्जक होत आपली हुकमती मुद्रा समाजमनावर उठवते आहे. अशा काळात माहिती, तंत्रज्ञान, पर्यटन, मनुष्यविकास, व्यवस्थापन, बँकिंग, विमा, संशोधन, प्रवास, शिक्षण, आरोग्य सर्वच क्षेत्रात तिला संवादी कौशल्य अनिवार्य झाल्याने स्त्री शिक्षणात संवादाचे महत्त्व अधोरेखित होत अग्रगामी, अग्रणी होते आहे. 'बोलणाऱ्याची माती पण विकली जाते, न बोलणाऱ्याचे मोती विकले जाणे दुर्लभ' असे सिद्ध करणाच्या या काळात स्त्रिस मूकदर्शक न राहता ध्वनिवर्धक बनणे काळाची गरज बनली आहे. उद्घोषणा, स्वागत अशी क्षेत्रे मागे पडून मध्यस्थ, सल्लागार, मार्गदर्शक अशा स्त्री प्रतिमा व प्रतिभांचे हे युग आहे.
संबंध वर्धन
 नव्या काळात स्त्रिचे बहुरूपी व्यक्तिमत्त्व तिला विविध संबंधांचा दुवा बनवत समाज, कुटुंब जीवनात ती अधिकारिणी बनते आहे. तिच्या या नव्या भूमिकेला वाव देणारे स्त्री शिक्षण हवे आहे. तरच ती समाज संबंधांचा सेतू समर्थपणे सांभाळू शकेल.
समूह नेतृत्व
 स्त्री पुरुषाची अनुगामी न राहता सहचर, सहयोगी बनत आता मार्गदर्शक भूमिकेत उभी आहे. राजकारण, समाजकारण, अर्थकारण सर्वच क्षेत्रांत तिची वाढती उपस्थिती केवळ संख्यात्मक वाढ राहिली नसून ती

नवे शिक्षण, नवे शिक्षक/६१