पान:नवे शिक्षण, नवे शिक्षक (Nave Shikshan , Nave Shikshak).pdf/61

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

बदलते आहे, रोज जगण्याची नवी आव्हाने उभी ठाकताहेत, या पार्श्वभूमीवर स्त्रियांनी निरंतर कौशल्य व क्षमता विकासाने स्वत:स स्वप्रज्ञ व स्वावलंबी बनवत रहायला हवे. यातूनच तिची पुरुष पराधीनता संपणार आहे.
चिकित्सक विचारशीलता
 'बाबा वाक्यं प्रमाणम्'चा जसा काळ संपला तसे पुरुषशरणतेचा युगही संपायला हवे. ते स्वतंत्र बुद्धीने स्त्री विकास होण्यानेच शक्य आहे. म्हणून स्त्री शिक्षणाचा विचार करता स्त्रित चिकित्सक विचारबुद्धी विकसित करण्यावर येथून पुढच्या शिक्षणात भर हवा का ? कसे ? जसे आवश्यक तसे असे का नाही ? अशी विचारणाही स्त्री करायला लागेल तेव्हाच ती दुय्यम दर्जाच्या मनुष्य जीवनातून मुक्त होऊन स्वतंत्र होईल. जात, धर्म, परंपरा, लिंग यांच्या दमन व जाचातून तिला आता कोणी समाजसुधारक, प्रेषित येऊन मुक्त करेल अशी अपेक्षा बाळगणे म्हणजे मृगजळामागे धावणे ठरेल. मीच माझी शिल्पकार म्हणत जेव्हा ती शोधक, चिकित्सक वृत्तीने आत्मस्वरामागे धावेल तेव्हाच ती खऱ्या अर्थाने स्वतंत्र मनुष्य बनेल. तसे शिक्षण हे बुद्धिप्रमाण, वैज्ञानिक, तंत्रकुशल आरखड्यातूनच शक्य आहे. त्यामुळे एकविसाव्या शतकातील शिक्षणाचा आकृतीबंध गुलामीस शह देत स्वप्रज्ञतेला साद घालणारा हवा.
नवतेचे अनुसरण
 नवता, नव आविष्करण, नव साधन विकास, नव तंत्रज्ञान हेच नव्या काळाची ओळख बनते आहे, त्यामुळे स्त्रिने नवतेचे (Innovation) वेड स्वत:ला लावून घेतले पाहिजे. ती स्वावलंबी बनायची, तिची बहुविध जबाबदारीतून मुक्ती व्हायची तर काळ, काम, वेगाचे तिचे असे नव गणित, नव व्यवस्थापन, वेळ नियोजन तिनेच करायला हवे. नव्या शिक्षणात स्त्रिचा नवा अवकाश वेध घेणारा अवसर हवा. स्वयंपाकगृह, शयनगृह, माजघरापलीकडे तिची स्वतंत्र खोली/दालन (Room of One's) घरात ज्या दिवशी निर्माण होईल तेव्हाच जीवनात तिचा स्वत:चा अवकाश (Space) निर्माण होईल. कुटुंब, मुले, पती यांच्यासाठी तर जगायचे आहेच पण स्वत:च्या इच्छा, आकांक्षांना महत्त्व व अवसर देत समाज विकास करायचा तर स्त्रिने नवतेचा, नव आविष्करण व अनुसरणाचा छंद जोपासायला हवा. शिक्षणाने तिला हे शिकवले तरच ती घराच्या घरघरीतून मुक्त होऊन स्वचित्त होईल.
संवेदना सूचकांक
 संवेदना, भावना यांचे आणि स्त्रिचे अद्वैत पारंपरिक आहे. त्याला

नवे शिक्षण, नवे शिक्षक/६०