पान:नवे शिक्षण, नवे शिक्षक (Nave Shikshan , Nave Shikshak).pdf/60

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

संबंध, सामूहिकता, सामाजिकता, स्वास्थ्य अशा अनेक निकषांवर तिच्या स्वत:च्या अपेक्षा व आकांक्षा जशा वाढत आहेत तशास समाज गरजाही. म्हणून एकविसाव्या शतकातील नव्या स्त्रिचे शिक्षणही नवे असले पाहिजे अशी मागणी जगभर जोर धरू लागली आहे. या पार्श्वभूमीवर जगातील नवे स्त्री शिक्षण नवसंकल्पना व नवक्षमता कौशल्यांचा वेध घेत स्त्रिस नवसंजीवनी देण्याची मनीषा बाळगून आहे.
नव क्षमता विकास
 वर्तमानात स्त्री शिक्षणाचा विचार करताना तिचे बहुविध रूप लक्षात घ्यायला हवे. पूर्वी तिला केवळ घर सांभाळावे लागे. आता तिचे स्वत:चे शिक्षण, व्यक्तिमत्त्व विकास, स्वतंत्र व्यक्ती, नोकरी/व्यवसाय, कौटुंबिक व सामाजिक जबाबदारी यांचे संदर्भात स्त्री शिक्षण विचारात घ्यावे लागणार आहे. त्यामुळे अशा शिक्षणाची रचना हवी जेणेकरून तिला साक्षर करून भागणार नाही तर ती सक्षमही हवी. ही सक्षमता बहुविध क्षमतांनी युक्त हवी. लेखन, वाचन, व्यवहार, संवाद, संपर्क, सामाजिकता, नेतृत्व, नवता, विज्ञान, 'अर्थार्जन' अशा अंगांनी तिच्या क्षमता विकसित होतील असे विविध शाखांच्या शिक्षणाचे पर्याय उपलब्ध करून देणे अनिवार्य झाले आहे. स्त्री-पुरुष समानतेच्या युगात समान क्षमता विकासाचे शिक्षण धोरण हवे.
स्वयंशिक्षण
 शिक्षण म्हणजे घोकंपट्टी नव्हे. ते माहिती संग्रहणही नाही. शिक्षण म्हणजे व्यक्ती विकास. हे एकदा मान्य केले की स्त्रिची मनुष्य म्हणून घडण होणे अपेक्षित ठरते. मग स्त्रिस पुरुषांच्या ओंजळीने पाणी न पिता स्वप्रज्ञतेने, स्वतंत्रतेने, स्वावलंबनाने शिक्षण घेण्याचे मुभा व संधी देणे हे सरकार, समाज, कुटुंब व पालकांचे कर्तव्य ठरते. शिवाय स्त्रिनेही स्वत:च्या आशा, आकांक्षा, स्वप्ने, विचारानुरूप संधीचा शोध घेत स्वत:ला विकसित करत राहिले पाहिजे. त्यासाठी स्वयंशिक्षण (Self Education) अथवा शिकायला शिकणे (Learning to Learn) सारख्या संकल्पनांचा अंगीकार स्वत:स्त्रीने आत्मसात करायला हवा.
आजीवन शिक्षण
 शिक्षण ही जन्मापासून ते मृत्यूपर्यंत चालणारी एक निरंतर विकास प्रक्रिया आहे, हे एकदा मान्य केले की स्त्रिने जीवनभर शिकत राहणे ओघाने आलेच, पूर्वी केवळ साक्षरतेने भागायचे. नंतर पदवीधर होण्यात समाधान व्हायचे. आता स्पर्धेचे युग आहे. शिवाय जीवन क्षणोक्षणी

नवे शिक्षण, नवे शिक्षक/५९