पान:नवे शिक्षण, नवे शिक्षक (Nave Shikshan , Nave Shikshak).pdf/59

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

नव्या स्त्रीचे नवे शिक्षण


 भारतात स्त्री शिक्षणाचा प्रारंभ स्वातंत्र्यपूर्व काळात झाला. विसाव्या शतकाच्या प्रारंभी एतद्देशीय समाजसुधारक महात्मा जोतिराव फुले, महर्षी धों. वि. कर्वे प्रभृतींनी स्त्री शिकावी म्हणून मूलभूत प्रयत्न केले. परिणामी स्वातंत्र्योत्तर काळात स्त्री शिक्षण गतिमान झाले. ब्रिटिश आमदानीतील १२% साक्षरता असलेला भारत सन २०११ च्या पंधराव्या जनगणनेनुसार ८०% साक्षर झाला असून त्यात स्त्री साक्षरतेचे प्रमाण ६५.४६% झाले आहे. जगातही ७७४ दशलक्ष शिक्षित नागरिकांत दोन तृतीयांश स्त्रिया आहेत. सन २०११ च्या जागतिक स्त्री विकास अहवालानुसार मुले-मुली यातील शिक्षण दरी अरुंद होत आहे. असे असले, तरी जगात अजून ७२ दशलक्ष मुले शिक्षणापासून वंचित असून त्यात ३९ दशलक्ष मुली आहेत. ते प्रमाण ५४% भरते. जगभर पटनोंदणी गतीने वाढते आहे, पण त्यात स्त्री प्रमाण पुरुषांची बरोबरी करू शकलेले नाही ही वस्तुस्थिती आहे. अगदी संगणक वापरातही स्त्री प्रमाण पुरुषांपेक्षा कमी आहे.
 एकविसाव्या शतकात जागतिकीकरणामुळे स्त्री विकास झपाट्याने होतो आहे. भारतात स्वातंत्र्यपूर्व काळात चूल आणि मूल असे असलेले स्त्री रूप बदलते आहे. स्त्री शिक्षण म्हणजे बाल संगोपन, गृह दक्षता, पाककला, शुश्रूषा, कलाकुसर निपुणता अशी कल्पना होती. स्त्री पत्नी, माता, गृहिणी, सखी, सोबती असे सूत्र होते. आता स्त्री साक्षर, शिक्षित, उच्च विद्याविभूषित, कमावती, पुरुषाच्या खांद्यास खांदा लावून जीवनाच्या सर्व क्षेत्रांत आघाडी घेणारी स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाची सबला बनते आहे. त्यामुळे स्त्री शिक्षणाच्या संकल्पनेतही झपाट्याने बदल घडून येत आहेत. क्षमता, कौशल्य, प्रक्रिया, विचार, नवता, संवेदना, संवाद, साधने,

नवे शिक्षण, नवे शिक्षक/५८