पान:नवे शिक्षण, नवे शिक्षक (Nave Shikshan , Nave Shikshak).pdf/54

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

भारताच्या उच्च शिक्षणाचा भविष्यवेध


 सन १९९० च्या भारताच्या मुक्त आर्थिक विकास धोरणानंतरच्या गेल्या २५ वर्षांत देशाची आर्थिक स्थिती झपाट्याने सुधारत आहे. जागतिक ज्ञानसमाजात भारतीय उच्च शिक्षणाची पत वधारते आहे. कौशल्य विकासकेंद्री शिक्षण नीतीचे हे फळ मानावे लागेल. भारतातील कुशल मनुष्यबळात निरंतर होणारी वाढ हे त्याचे कारण होय. भारतीय उच्च शिक्षण विकास व विस्ताराची ही फलश्रुती आहे. त्यामुळे उच्च शिक्षणाचे प्रमाण वाढवणे हे भारतीय शिक्षण क्षेत्रापुढे एक आव्हान होऊन राहिले आहे. अद्याप आपण उच्च शिक्षण प्रमाण दोन अंकी करू शकलेलो नाही. त्याच्या आपण जवळ पोहोचलो आहोत, हे मात्र खरे. भारतीय उच्च शिक्षण हे आजारी बाळाप्रमाणे मंदगतीने वाढते आहे, हा खरा आपल्या चिंतेचा प्रश्न बनून राहिला आहे. देशाची प्रचंड कुशल मनुष्यबळाची गरज सध्याचे उच्च शिक्षण भागवू शकत नसल्याने त्याची कमतरता भरून काढण्यासाठी उच्च शिक्षणाच्या विकास व विस्तारास पर्याय उरला नाही.
 भारतीय उच्च शिक्षणापुढील वर्तमान आव्हान खरे तर न उचलता येणारे शिवधनुष्य खरे, पण केव्हा तरी ते आपणास उचलले पाहिजे, याची जाणीव आता आपल्या देशास तीव्रतेने झालेली दिसते. कारण सिंगापूर, फिनलंड, दक्षिण कोरिया, स्विट्झर्लंडसारखे छोटे देश जर उच्च शिक्षणात जागतिक क्रमवारीत आघाडी घेत असतील तर खंडप्राय भारत देशास स्वस्थ बसून कसे चालेल? आपल्याकडे शिक्षण विस्तारात गती असली, तरी गुणवत्ता विकासात आपण मागे आहोत, कारण संशोधन, नवोपक्रमशीलता हे आपल्या शिक्षणाचे नर्मबिंदू (Weak Points) होत. अपरिवर्तनीय अभ्यासक्रम, किचकट संलग्नता, मान्यता, समकक्षता प्रक्रिया हेही आपल्या

नवे शिक्षण, नवे शिक्षक/५३