पान:नवे शिक्षण, नवे शिक्षक (Nave Shikshan , Nave Shikshak).pdf/49

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

विजेते अर्थशास्त्रज्ञ डॉ. अमर्त्य सेन या विद्यापीठाचे कुलपती आहेत. इतिहास शासन आणि पर्यावरण असे दोन अधिविभाग विद्यापीठात सुरू झाले असून प्रत्येक अधिविभागात पंधरा विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे.
 नालंदा आंतरराष्ट्रीय विद्यापीठ स्थापन करण्याचा विचार भारतीय उच्च शिक्षणाच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या चिंतेतून पुढे आला. प्रतिवर्षी जगातील पहिल्या १०० गुणवत्ताप्रधान विद्यापीठाची यादी इंग्लंडच्या 'टाइम्स' मार्फत प्रकाशित होते, ती थॉमसन रिचर्सच्या परिमाणांच्या आधारे. अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठास हा मान वर्षानुवर्षे मिळत आला आहे. या यादीत जगातील छोट्या राष्ट्रांची विद्यापीठे असतात, पण भारतची त्यात असत नाहीत अशी चिंता विद्यमान राष्ट्रपती प्रणव मुखर्जी सतत व्यक्त करत असतात.
 या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील उच्च शिक्षणाचा विचार करणे आवश्यक आहे. महाराष्ट्राची लोकसंख्या सन २०११ च्या जनगणनेनुसार ११२३.७ लक्ष इतकी आहे. साक्षरतेचे प्रमाण ८२.३% आहे, उच्च शिक्षणाचा वयोगट १८ ते २३ वर्षे मानला जातो. त्यानुसार १३४.७ लक्ष युवक उच्चशिक्षित असणे अपेक्षित आहे. लोकसंख्येच्या २७.६% युवकांपैकी अवघे १०.६% युवकच महाराष्ट्रात पदवी व उच्च शिक्षण घेतात.
 महाराष्ट्रात १८ सार्वजनिक (शासकीय) विद्यापीठे, १४ खासगी अभिमत विद्यापीठे, ७ शासकीय अभिमत विद्यापीठे, राष्ट्रीय शिक्षण संस्था-३, केंद्रीय विद्यापीठ-१, मुक्त विद्यापीठ-१ अशा एकूण ४४ विद्यापीठीय दर्जाच्या शिक्षण संस्था कार्यरत आहेत. त्यात वैद्यकीय ६, तंत्रज्ञान-४, कृषी-४ तर सर्वसाधारण शिक्षण देणाऱ्या ३० विद्यापीठांचे वर्गीकरण पाहता अजून आपण पारंपरिक व सर्वसाधारण शिक्षण (कला, वाणिज्य, विज्ञान) यातच अडकून आहोत हे स्पष्ट होते. पदवी शिक्षणाचा विचार करायचे झाले तर राज्यात ४५१२ संलग्न महाविद्यालये असून त्यात ३२.३३ लक्ष विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. पैकी २८% महाविद्यालये शासकीय असून ४५% खासगी विनाअनुदानित तर २६% खासगी अनुदानित आहे. राज्यात ७८% विद्यार्थी पदवीपर्यंतचे शिक्षण घेतात तर अवघे ११.४% विद्यार्थी विद्यापीठ शिक्षणापर्यंत पोहोचतात. साहाय्यक प्राध्यापक ६१% तर प्राध्यापक दर्जाचे शिक्षक अवघे ११% आहेत.
 उच्च शिक्षणात आपण आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत का पोहोचू शकत नाही तर त्याचे वास्तव इथल्या रचनेत आहे. मुंबई, पुणे, कोल्हापूर,

नवे शिक्षण, नवे शिक्षक/४८