पान:नवे शिक्षण, नवे शिक्षक (Nave Shikshan , Nave Shikshak).pdf/48

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आंतरराष्ट्रीय दर्जा व महाराष्ट्रातील विद्यापीठे


 नालंदा विद्यापीठाचे भारतीय संस्कृतीत महत्त्वाचे स्थान आहे, ते तिच्या प्राचीनतेमुळे. ती प्राचीनता सम्राट अशोकापासून मानली जाते. इसवी सनाच्या पाचव्या, सहाव्या शतकात या स्थळाची भरभराट झाली. पुढे हर्षवर्धन व पाल राजांच्या काळात (आठवे ते बारावे शतक) इथले विद्यापीठ जागतिक मान्यतेचे बनले. त्या काळात या विद्यापीठात भारतातील कानाकोपऱ्यातून जसे विद्यार्थी येत, तसे ते चीन, कोरिया, तिबेट इत्यादी देशांतून येत. चीनी प्रवासी ह्युएन संग, इत्सिंग, फाहियान यांनी आपल्या प्रवासवर्णनात नालंदा विद्यापीठाच्या लौकिकाचे वर्णन केल्याचे आढळते. इथे निवासासाठी ४००० खोल्या होत्या. १००० वर्ग होते, ८५०० विद्यार्थी शिक्षण घेत. १५०० शिक्षक शिकवत. बौद्ध, जैन, हिंदू धर्माचे शिक्षण दिले जायचे. योग, व्याकरण, साहित्य, भाषा, तर्कशास्त्र, मंत्रविद्या, दंडनीती, वेदविद्या इत्यादी विषय शिकले, शिकवले जायचे. आर्यदेव, सिनभद्र, कर्णमती, स्थिरमती, गुणमती, बुदकीर्ति, शांतरक्षित, कमलशील आदी प्राचीन विद्वान या विद्यापीठातून निर्माण झाल्याचे सांगण्यात येते. भगवान बुद्ध व महावीरांचा विहार या परिसरात असल्यानेही त्याचे महत्त्व आहे.
 अशी प्राचीन परंपरा लाभलेल्या नालंदा विद्यापीठाच्या पुनरुज्जीवनाचा विचार तत्कालीन राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी प्रथम मांडला, त्यास संसदेने मान्यता देऊन सन २०१० मध्ये नालंदा विद्यापीठ विधेयक मंजूर केले. जपान, सिंगापूरने त्यास मोठे अर्थसाहाय्य दिले. त्यातून नालंदा आंतरराष्ट्रीय विद्यापीठ उदयास आले. १ सप्टेंबर, २०१४ रोजी विधिवत हे विद्यापीठ कार्य करू लागले असून नोबेल पारितोषिक

नवे शिक्षण, नवे शिक्षक/४७