पान:नवे शिक्षण, नवे शिक्षक (Nave Shikshan , Nave Shikshak).pdf/46

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

पर्सन, सर्व्हेअर्स, शिंपी, मशिनिस्ट, टर्नर, फिटर, पेंटर, इलेक्ट्रिशियन, रिपेअर्स, गॅरेजमन, फार्मासिस्ट, टेक्निशियन्स मिळत नाहीत. म्हणजे गरज आहे, पण कुशल मनुष्यबळ नाही. परिणामी, आपली अधिकांश कामे अकुशल श्रमिक करतात, मग इथल्या उत्पादनाला 'Make in India' चा दर्जा केवळ भाषणातच सापडणार ना? म्हणून आता आपण 'राष्ट्रीय कौशल्य विकास धोरण-२०१५' जाहीर केले आहे. भारतात गरजेपेक्षा ३० कोटी मनुष्यबळाची कमतरता आहे. ती भरून काढण्यासाठी हे धोरण आहे, पण त्यात उच्च माध्यमिक शिक्षणाच्या व्यावसायिकतेचा अंतर्भाव दिसत नाही. स्नॅपडीलसारख्या एका कंपनीला केवळ वितरक म्हणून एका वर्षात दुप्पट माणसं लागतात. यावरून आपण आपल्या मनुष्यबळ विकासाची योजना करायला हवी. मागणी व पुरवठा हे अर्थशास्त्राचेच तत्त्व नसून ते शिक्षणासही लागू आहे, हे केव्हातरी आपण समजून घेतले पाहिजे.
 उच्च माध्यमिक स्तरावरील शिक्षणाबाबत विचार करण्यासाठी नेमलेल्या ईश्वरभाई पटेल समितीने १९७७ साली हे शिक्षण समाजोपयोगी उत्पादक शिक्षण व्हायला पाहिजे म्हणून आग्रह धरत स्पष्ट केले होते की, "Socially Useful Productive Work (SUPW) may be describe as purposive, meaningful, manual work resulting in either goods or services which are useful to community." इतके साधे लक्ष्य पण आपण साध्य करू शकलो नाही, म्हणून भविष्यकाळात राष्ट्रीय माध्यमिक शिक्षण अभियानाचा भाग म्हणून (RMSA) उच्च माध्यमिक शिक्षण सार्थक, उत्पादक, कौशल्य केंद्रित करण्यावर भर द्यायला हवा. त्यासाठी श्रमाला प्रतिष्ठा देण्याची मानसिकता समाजात रुजवणे आवश्यक आहे. भारतीय मानस नोकरी केंद्रित आहे. ते व्यवसाय केंद्रित कसे होईल, ते पाहायला हवे. सामूहिक कार्य संस्कृतीचा संस्कार हे आपल्यापुढील एक नवे आव्हान आहे, सकारात्मक दृष्टिकोनही आज अनिवार्य होऊन बसला आहे. सहकार्य भाव, आज्ञाधारकपणा, कार्यतत्परता (कर्तव्यपरायणता) यांचा अभाव हे कुशल मनुष्यबळ निर्मितीतील अडथळे आहेत. लोकशाही, संघटन, हक्क अशा त्रिस्तरीय प्रक्रियेतून कार्यक्षम मनुष्यबळ निर्मिती केवळ काल्पनिक ठरेल का अशी शंका वाटावी अशी समाज स्थिती असली तरी तीवर मात करून आपण कुशल मनुष्यबळ विकासाचे लक्ष्य गाठावेच लागेल. त्याला पर्याय नाही. 'मन की बात' व्यक्त करत राहायचं की 'मन की बात' कृतीत आणायची यातला पर्याय निवडायची वेळ येऊन ठेपली आहे, मूलगामी विचार व कृतीचे अद्वैतच भारतीय जनमानसास नवी

नवे शिक्षण, नवे शिक्षक/४५