पान:नवे शिक्षण, नवे शिक्षक (Nave Shikshan , Nave Shikshak).pdf/45

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

अनुभवले आहे, शिक्षित स्त्रियांसाठी घर व नोकरीचा मेळ घालणाऱ्या जपानमध्ये असलेल्या योजना, सवलती देशाचे द्रष्टेपण सिद्ध करणाऱ्या होत्या, एकच उदाहरण सांगतो. नोकरदार स्त्रीस बाळ झाल्यावर ती बाळ शाळेत जाईपर्यंत रजा घेऊ शकते, ती परत नोकरीत येते तेव्हा तिचे सारे पूर्वाधिकार सुरक्षित असतात. (पदोन्नती, पगारवाढ, रजा इ.)
 उच्च माध्यमिक अभ्यासक्रम म्हणजे कुशल मनुष्यबळ विकासाच्या शिक्षणाचा कालखंड, देशाला लागणाऱ्या श्रमिक मनुष्यबळाला कौशल्य प्रशिक्षण देऊन तयार करण्याची ही संधी. ती आपण सर्वसाधारण शिक्षण देत बसल्याने गमावतो आहोत. भारतात सन २००० ते २०१२ मध्ये झालेल्या कार्यरत मनुष्यबळाचे क्षेत्रनिहाय परिवर्तन खालीलप्रमाणे आहे -

क्षेत्र वर्ष २००० वर्ष २००५ वर्ष २०१० वर्ष २०१२
१) कृषी ५९.८% ५५.८% ५१.१% ४७.२%
२) उद्योग १६.१% १९.०% २२.४% २४.७%
३) सेवा २४.१% २५.२% २६.५% २८.१%

 कृषी क्षेत्रातील मनुष्यबळात घट होते आहे. उद्योग व सेवा क्षेत्रातील मागणी वाढते आहे. हे लक्षात घेऊन आपण आपले उच्च माध्यमिक शिक्षण व अभ्यासक्रम आखतो का ?
 जगातील कित्येक छोटे देश केवळ कुशल मनुष्यबळावर (Skilled Workforce) बलाढ्य झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर आपण कुठे आहोत, हे पाहणे आवश्यकच नाही, तर अनिवार्य झाले आहे -

देश कुशल मनुष्यबळ
दक्षिण कोरिया ९६%
जपान ८०%
जर्मनी ७५%
ब्रिटन ७०%
भारत २%

 उच्च माध्यमिक शिक्षण स्तराच्या उपेक्षेचा हा गंभीर परिणाम होय. आपल्याकडे विधिवत शिक्षण, प्रशिक्षण, प्रमाणपत्र धारक सुतार, गवंडी, प्लंबर, साईट सुपरवायझर, आया (दाई), मेडिकल रिप्रेझेंटिटिव्ह, मार्केटिंग

नवे शिक्षण, नवे शिक्षक/४४