पान:नवे शिक्षण, नवे शिक्षक (Nave Shikshan , Nave Shikshak).pdf/42

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

स्तरांवरील शिक्षणात अत्याधुनिक शैक्षणिक संसाधनांचा वापर होणे, माध्यमिक शाळांतील दैनंदिन अध्यापनात माहिती व तंत्रज्ञानाचा वापर वाढणे, गुणवत्तावाढीसाठी आवश्यक आहे. समाजाची व जागतिक गरज लक्षात घेऊन मनुष्यबळ विकासाचे साधन व माध्यम म्हणूनही माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणाकडे पाहणे ही आता काळाची गरज बनली आहे. बदलत्या काळाची आव्हाने लक्षात घेता माध्यमिक शाळांची जागा, इमारत सुविधा, विद्यार्थी संख्या, व्यावसायिक अभ्यासक्रमांची उपयुक्तता, स्थानिक गरजा, शैक्षणिक साधने व सुविधा, प्रशिक्षित व तज्ज्ञ शिक्षक या सर्वच बाबींवर सूक्ष्मपणे व खोलात जाऊन विचार व कृती करण्याची गरज आहे. शाळाबाह्य विद्यार्थी माध्यमिक शाळेत आणण्यासंदर्भात ही भविष्यकाळात कृतिकार्यक्रम आखणे व त्याची अंमलबजावणी करणे तितकेच महत्त्वाचे आहे. माध्यमिक शिक्षण पूर्ण करणारे, किमान शालांत परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थी निर्माण करणे जगाचे उद्दिष्ट बनायला हवे. तसे झाले तरच उच्च माध्यमिक गुणवत्ताप्रधान शिक्षणाद्वारे आपण प्रत्येक देशातील कुशल मनुष्यबळ, प्रशिक्षित युवा पिढी घडवून बेरोजगारीवर मात करू व देशाचा अपेक्षित विकास साधू शकू.

•••

 (युनेस्कोद्वारा माध्यमिक शिक्षणासंदर्भात विशेष विचार करून प्रकाशित करण्यात आलेल्या 'ग्लोबल एज्युकेशन डायजेस्ट-२०११' च्या गोषवाऱ्याचा भारत संदर्भित मुक्त अनुवाद.)

नवे शिक्षण, नवे शिक्षक/४१