पान:नवे शिक्षण, नवे शिक्षक (Nave Shikshan , Nave Shikshak).pdf/34

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

नजीकच्या काळातील आपले ध्येय असून ते साध्य करू शकलो, तरच माध्यमिक शिक्षणाचे सार्वत्रिकरण झाले असे म्हणता येईल. याशिवाय माध्यमिक शाळांच्या वर्ग खोल्यांत वाढ, मुला-मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छ व सुविधा सुलभ शौचालये, पिण्याच्या पाण्याची सोय, प्रकाश, वायुविजन, वीज, संगणक, इंटरनेट, दूरदर्शन, प्रोजेक्टर्स इ. व्यवस्थाच्या रूपाने शाळा भौतिक व शैक्षणिक साधन संपन्न करावयाच्या आहेत.
 हे जरी खरे असले, तरी जगात माध्यमिक शिक्षणाच्या क्षेत्रात आघाडीवर असलेल्या देशांनी माध्यमिक शिक्षणाच्या गुणवत्ता विकासाच्या प्रांतात जी गरुडभरारी घेतली आहे, ती पाहता आपण शिक्षण क्षेत्रात करू पाहात असलेल्या सुधारणा प्राथमिक व जुजबीच म्हणाव्या लागतील. अजून आपण भौतिक संपन्नतेच्या गर्तेत आहोत. बौद्धिक संपन्नता व विकास ही त्यानंतरची गोष्ट असते, हे आपण लक्षात ठेवायला हवे. माध्यमिक शिक्षणाच्या क्षेत्रात जागतिक क्रमवारीत पुढील पाच देशांचा समावेश होतो- १) दक्षिण कोरिया २) फिनलंड ३) कॅनडा ४) न्यूझीलंड ५) जपान. भारताचे आकारमान, साधन संपत्ती, मनुष्यबळाचा विचार करता हे देश छोटे आहेत. तरी त्यांनी अमेरिका, रशिया, चीन, भारतादी महासत्ता असलेल्या वा होऊ पाहणाऱ्या देशांच्या तुलनेने कशी प्रगती केली, हे समजून घेतल्याशिवाय अशी प्रगती आपण करू शकणार नाही.
 वरील देशांत माध्यमिक स्तरावर विषय निवडीचे जे पर्याय व स्वातंत्र्य आहे, त्या तुलनेत आपला विषय विस्तार अपुरा आहे. जगात माध्यमिक स्तरावर शिकवले जाणारे काही विषय असे आहेत की त्यांचा आपण विचारही केलेला नाही. उदाहरणार्थ, अभियांत्रिकी शोध, ग्राफिक डिझायनिंग, नर्सिंग, वाहतूक व्यवस्थापन, मरीन इंजीनिअरिंग, क्रीडा वैद्यकशास्त्र, पत्रकारिता व माध्यमविकास, माहिती व तंत्रज्ञान इ. जगात ऑनलाईन होम वर्क, मूल्यांकन वाढते आहे, स्वयंशिक्षणावर मोठा भर आहे. प्रश्नोत्तरांच्या, स्मरणशक्तीच्या पलीकडच्या अध्ययनात प्रकल्प कार्य, निर्मिती, सर्वेक्षण, संग्रहण, पृथक्करण, वर्गीकरण, विश्लेषण यावर भर दिला जात आहे. आपण वस्तुनिष्ठ कसोट्यातच गुंतून आहोत. आपली परीक्षा स्मरण समर्पित आहे, ती जीवनलक्ष्यी नाही. त्यामुळे शिक्षण व जीवन (वास्तव) यात आपल्याकडे मोठी दरी आहे. आपण पुरेसे नि पात्र शिक्षक देऊ शकलो नाही, ही वस्तुस्थिती आहे. शिक्षकांचा स्तर जागतिक प्रतवारीत सरासरीच गाठणारा आहे.
 या पार्श्वभूमीवर दक्षिण कोरियाचे शैक्षणिक मॉडेल समजून घेणे

नवे शिक्षण, नवे शिक्षक/३३