पान:नवे शिक्षण, नवे शिक्षक (Nave Shikshan , Nave Shikshak).pdf/25

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

प्रकारचे प्रयत्न करताना दिसून येते. आपणास त्यातून बरेच शिकता येणे शक्य आहे. ऑस्ट्रेलियात शाळेत शिकण्यास अनुकूल वातावरण निर्मिण्याकडे अधिक लक्ष पुरविले जाते. प्राथमिक शाळा गुणवत्तेची हमी देतात. तेथील शिक्षण वास्तवाधारित ठेवण्याकडे कटाक्ष असतो. शिक्षणाचे ध्येय, लक्ष्य निश्चित केलेले असते. ते प्राप्त करण्यासाठी दैनंदिन मूल्यमापनाकडे, नोंदीकडे पुरेसे लक्ष ठेवले जाते. शिक्षणात समस्या सोडवण्यावर (Problem Solving) भर असतो. सहकारी विद्यार्थी (Peer) एकमेकांस शिकवत असतात. मिळून शिकण्यावर भर असतो. सर्व विषय एकमेकांच्या संदर्भात शिकविण्याची (Interdisciplinary Approach) पद्धत रूढ आहे, प्रकल्पाधारित शिक्षण (Project Based Learning) हे तेथील अध्ययन-अध्यापनाचे बलस्थान आहे. शिक्षक शिकविण्यापेक्षा मदत, मार्गदर्शकाची भूमिका निभावतात.
 जगात फिनलंडसारखा छोटा देश प्राथमिक शिक्षणातील गुणवत्ता विकासात सतत प्रथम क्रमांकाचा देश राहिला आहे. चाळीस वर्षांपूर्वी या देशाने शिक्षण क्षेत्रात सुधारणा करण्याचे ठरवले. त्यात प्रयोग, परिवर्तन निरंतरता ठेवत आज तो देश प्राथमिक शिक्षणातील अग्रणी देश बनला आहे. १,३0,५९६ चौरस मीटर क्षेत्रफळ असलेला हा युरोपीय देश स्वीडन, नॉर्वे, रशिया, एस्टोनियामध्ये वसलेला. ५४,७४,०९४ इतकीच लोकसंख्या. दरडोई उत्पन्न ४०,००० डॉलर्स. पण शिक्षणविषयक जागृतीमुळे तो बलाढ्य ठरला. त्या देशाची स्वत:ची अशी एक शिक्षण दृष्टी, नीती, कार्यपद्धती, धोरण आहे. एक म्हणजे तिथे मुलांना ६ वर्षे पूर्ण झाल्याशिवाय शाळेत घातलेच जात नाही (आणि खरे सांगायचे तर घेतलेच जात नाही). विद्यार्थी पौगंडावस्थेत येईपर्यंत त्यांना ना गृहपाठ दिला जातो ना त्यांची कसली परीक्षा घेतली जाते. (वय वर्षे १२ / इयत्ता ६ वी). विद्यार्थी १६ वर्षांचा झाला की तो सार्वत्रिक परीक्षेला (Board Examination) पात्र समजण्यात येतो. हुशार व ढ सर्व विद्यार्थ्यांना एकत्र व एकाच वर्गात शिकवले जाते, गुणवत्ताधारित तुकड्या नसतात. तरी अमेरिकेपेक्षा त्यांचा शिक्षण खर्च सुमारे ३०% कमी असतो. ३०% विद्यार्थ्यांना वयाच्या ९ व्या वर्षांपर्यंत अधिक साहाय्य/लक्ष पुरविले जाते. शालेय शिक्षणातून ६६% विद्यार्थी महाविद्यालयात जातात. अन्य व्यवसाय वा व्यावसायिक शिक्षणाकडे वळतात. हुशार व सामान्य विद्यार्थ्यांत अल्प अंतर असते, हे तेथील शैक्षणिक गुणवत्तेचे खरे रहस्य. 'किमान गुणवत्तेचे कमाल विद्यार्थी' हे

नवे शिक्षण, नवे शिक्षक/२४