पान:नवे शिक्षण, नवे शिक्षक (Nave Shikshan , Nave Shikshak).pdf/24

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

'सर्व शिक्षा अभियान' भारतातील प्राथमिक शिक्षण भौतिक सुविधा संपन्न करणारे ठरले. केव्हा तरी शाळांना फळा देणारे (Operation Black Board) आपले भारत राष्ट्र प्राथमिक शाळांना संगणक, इमारत, ग्रंथालय, पेयजल, प्रसाधन कक्ष, प्रयोगशाळा, शिक्षक पुरविणारे शिक्षण समृद्ध राष्ट्र बनते. हे खरेच वाटत नाही. भौतिक सुविधांशिवाय सर्व शिक्षा अभियानामुळे भारतीय प्राथमिक शिक्षणात अनेक गुणवत्ताप्रधान बदल झालेत. बहुसंख्य विद्यार्थ्यांत शिकण्याची गोडी निर्माण झाली. अधिकांश शाळा, वर्गातून बहुस्तरीय अध्यापन, आंतरशाखीय अध्यापन रूढ झाले. शिक्षक-विद्यार्थी प्रमाण जागतिक प्रमाणाच्या निकट पोहोचू शकल्याने शिक्षक-विद्यार्थी यांच्यामधील दरी, अंतर कमी होणे शक्य झाले. बहुतेक शिक्षक विद्यार्थ्यांच्या प्रगतीकडे लक्ष पुरवू लागल्याने व्यक्तिकेंद्रित अध्ययन-अध्यापन प्रक्रिया गतिमान झाली. शिक्षण विकासात मागे राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात आलेल्या सुधार-शिक्षण (Remedial Teaching) योजनेबद्दल विद्यार्थी-पालकांत जागृती, जाणीव कमी असल्याने अपेक्षित यश जरी येऊ शकले नसले, तरी ज्यांनी प्रतिसाद दिला, सहकार्य दिले, अशा विद्यार्थ्यांत प्रगती दिसून आली. शिक्षक क्षमता विकास (Capacity Building) कार्यक्रम शिक्षकांच्या उत्साही सहभागामुळे परिणामकारकरित्या यशस्वी झाला. पण कृती संशोधनाच्या आघाडीवरील यश मात्र लाक्षणिकच ठरले. समाज सहभाग वाढला. हे सर्व यश प्राथमिक शिक्षणाच्या जागतिक प्रगतीचा आलेख पाहता प्राथमिकच म्हणावे लागेल. प्राथमिक शिक्षणात जगात आघाडीवर असलेल्या देशातील प्राथमिक शिक्षणाची प्रगती त्यांच्या नि आपल्यातील गुणवत्तेची दरी अधोरेखित करते.
 ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक को-ऑपरेशन अँड डेव्हलपमेंट (OECD), प्रोग्रॅम फॉर इंटरनॅशनल स्टुडंट असेसमेंट (PISA) या जागतिक शैक्षणिक दर्जा ठरविणाऱ्या अनुक्रमे फ्रान्स व अमेरिकेतील संस्था होत. त्यांच्यानुसार दक्षिण कोरिया, फिनलंड, कॅनडा, न्यूझीलंड, चीन, सिंगापूर, हाँगकाँगसारखे देश वाचन, गणित, विज्ञान या विषयांतील गुणवत्तेच्या आधारे जागतिक क्रमवारीत आघाडीचे देश मानले जातात. 'युनेस्को' च्या क्रमवारीत भारत १०५ व्या क्रमावर दिसतो. शिक्षण विकासात भारतास किती मजल गाठावयाची आहे, याचे भान येण्यास ही क्रमवारी लक्षात ठेवायला हवी.
 जगातील अनेक देश प्राथमिक शिक्षण दर्जेदार व्हावे, म्हणून अनेक

नवे शिक्षण, नवे शिक्षक/२३