पान:नवे शिक्षण, नवे शिक्षक (Nave Shikshan , Nave Shikshak).pdf/21

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

शिक्षणाचे. जगात ७ वर्षांपर्यंत बालशिक्षण चालते. आपणाकडे पाचव्या वर्षीच संपते. मुलांची वाढ होण्यापूर्वीच आपणाकडे बौद्धिक ताण दिला जातो. जन्म ते सात वर्षे हा बालशिक्षणाचा जगमान्य कालावधी आहे. तो मानसशास्त्रीय जसा आहे, तसा तो समाजशास्त्रीय व शैक्षणिकही आहे. बालशिक्षणाची भूमिका अनुभवास जीवन जोडायची असायला हवी. शिक्षणास पूरक वातावरण व व्यक्तिमत्त्व विकास हे बालवाडीचे ध्येय असायला हवे. वर्ग शिक्षणावर भर हवा. बाह्य शिक्षण प्रासंगिक हवे. शिक्षणात कुटुंब व पालक गृहीत व अंतर्भूत हवेत. मूल्याधिष्ठित स्वावलंबी, स्वप्रज्ञ नागरिक घडविण्याचे लक्ष्य हवे. शिस्त, संस्कृती आणि संस्कार हवेत.
 एकविसाव्या शतकातील बालवाडी चालवत असताना बदललेल्या पर्यावरणाचे भान हवे, गती, तंत्र मनात हवे. आधुनिकता गृहीत हवी. शहर, गाव, भेद लक्षात घेऊन नियोजन, अभ्यासक्रम हवेत. विशेष मुलांकडे विशेष लक्ष हवे. 'सब घोडे बारा टक्के' असे सरधोपट शिक्षण नको. मुलांच्या गरजांवर आधारित शिक्षण हवे. मुलांच्या क्षमतांचा विचारही महत्त्वाचा. मुले सक्रिय, शिक्षक मार्गदर्शक, मदतनीस अशी शिक्षण रचना हवी. सांघिक वर्तन व व्यक्तिविकास याचे संतुलन व समन्वय म्हणजे बालकांचे सामाजीकरण व स्वावलंबन. ज्ञानापेक्षा व्यक्तिमत्त्व विकास महत्त्वाचा. निरंतर मूल्यमापनातून अभ्यासक्रम लवचीक ठेवायला हवा, तर प्रत्येक मुलाच्या विकासाकडे लक्ष पुरवणे, केंद्रित करणे शक्य होईल. शंका समाधान, जिज्ञासावर्धन, कौशल्य विकास या तिन्हीत समन्वय घडवत बाल शिक्षणाची आखणी, मांडणी व अंमलबजावणी व्हायला हवी. ज्ञानरचनावाद हवा, पण लक्ष्य मनुष्यबळ विकासच हवे. सर्जनात्मकता, रचनात्मकता, रंजकता, आनंद, नवता, तंत्र साधनांचा वापर यातूनच मुले काळाची आव्हाने पेलण्यास सक्षम होतील याचे भान हवे.
 एकविसाव्या शतकातील बालवाडीत अंक, अक्षर, गाणी, गोष्टी, कला, कौशल्य, सांघिक जीवन, स्वावलंबन, रंजन यांचा समन्वय साधणे संपन्नतेतूनच शक्य आहे. त्यासाठी शाळेत गणित, घड्याळ, मोजमाप, यांची साधने हवीत. लेखन, वाचन विकासाची साधने हवीत. तंत्र आणि मंत्र (माणूस आणि यंत्र) यांचा समन्वय, संतुलन हवे. आपणास माणसाचा रोबो बनवायचा नाही, माणूस अधिक समाजशील, संवेदी, संवादी, कुशल बनवायचा आहे. शाळेत ग्रंथालय हवेच, प्रयोगशाळा हवी, लँग्वेज लॅब हवी, नाट्यगृह हवे, ऑर्केस्ट्रा हवा. हे सारे जमवत समाजाला गवसणी

नवे शिक्षण, नवे शिक्षक/२०