पान:नवे शिक्षण, नवे शिक्षक (Nave Shikshan , Nave Shikshak).pdf/19

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

विद्यार्थी अनुकूल हवा. विद्यार्थ्यांना निरंतर प्रोत्साहन, प्रेरणा देण्याची शिक्षकाची भूमिका हवी. शिक्षकांची सकारात्मक वृत्तीच बालकांच्या मनातील शाळेविषयीचे भय दूर करून रचनात्मक आकर्षण, अभिरुची निर्माण करू शकते, हे सतत लक्षात ठेवले पाहिजे.
 बालवाडीचा अभ्यासक्रम आपण बालकांना कसे घडवणार आहोत, ते ठरवून रचायला हवा. म्हणजे आपणास आपली मुलं पोपट हवीत की गरुड हे ठरवलेच पाहिजे. ती सावलीतील रोपे वा ग्रीन हाउसमधील फुले न राहता उन्हातान्हात स्वबळावर वाढणारी झाडे-झुडपे व्हायची तर मुले कुशीत न घेता, ती पहिल्या दिवसापासूनच पाळण्यात ठेवायला हवीत. बालपणीच ती पोहायला हवीत. ती लवकर स्वावलंबी करण्यावर भर हवा. बालवाडीत स्वच्छता, स्वावलंबन, स्वाध्याय, स्वयंशिक्षणावर भर हवा. बालवाडी तासापासून दिवसापर्यंत वाढत जाणारी हवी. वेळापत्रकात वैविध्य हवं, शिवाय त्यात लवचीकताही, मुलागणिक विकास योजना हवी. मुले मर्यादित, शिक्षक अमर्याद-हे सूत्र स्वयंपूर्ण विकासाकडे आपणास नेईल. मी सन १९५४-५५ च्या दरम्यान बालवाडीत होतो. बालवाडी आमच्या अनाथाश्रमाचीच होती. आमच्या बाई नलिनी जोशी त्यांना आम्ही नन्नीताई म्हणत असू. त्या माँटेसरीबाईंकडे शिकलेल्या होत्या, आमची बालवाडी प्रशस्त होती, स्वागत कक्ष, वर्ग, स्वयंपाकघर, शयनकक्ष, भांडार, प्रसाधनगृह, बगीचा सारे होते. बाई नमस्ते म्हणून आमचे स्वागत करायच्या. त्या आमचे कपडे, भांग, बटणे पाहायच्या. बालवाडीत केस विंचरायची सोय होती. आरसा, कंगवा, पावडर, तेल, नॅपकीन, नेलकटर, साबण, पाणी सारे विपुल, पण वापरण्याचा कटाक्ष मात्र काटकसरीवर असायचा. प्रार्थनेने बालवाडी सुरू व्हायची. खेळ म्हणजेच शिक्षण होते. साधनांची खोली गच्च भरलेली असायची. दट्टा पेटी, मनोरे, साचे, फ्रेम्स, किसणी, विळी, झाडू, चित्रे, तक्ते, मॉडेल्स, सूप, परात, कपडे, सुईदोरा, सार त्या खोलीत होते. निवडणे, कुटणे, किसणे, कापणे सर्व शिकवले जायचे. दोरा ओवणे, बटण लावणे, बंध बांधणे, गाठी मारणे / सोडणे, बुटाला लेस घालणे /काढणे; सारे बाई आम्हांस शिकवत. गाणी, नाच, नक्कल, उड्या, मेणकाम, मातीकाम, कागदाच्या लगद्यापासून भांडी बनवणे, होडी, घसरगुंडी, खुरपे, झारी, पेरणे, खुरपणे सारे लुटुपुटु असायचे. सहल, प्रदर्शन, सर्कस, जत्रा, वारी, मेरी गो राऊंड, वाळू कुंड, पाणी हौद सर्व होते. बालवाडीत मला जे शिक्षण मिळाले ते परत कधीही, कुठेही

नवे शिक्षण, नवे शिक्षक/१८