पान:नवे शिक्षण, नवे शिक्षक (Nave Shikshan , Nave Shikshak).pdf/174

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 भारताच्या काय किंवा महाराष्ट्राच्या काय एकूणच शिक्षण, शिक्षक, अभ्यासक्रम, पाठ्यपुस्तके, अध्ययन, अध्यापन, सर्वास आपण एका चौकटीत बंदिस्त करून शिकवत आलो आहोत. आपल्याकडे प्रत्येक वर्गाचा अभ्यासक्रम असतो. तो आपण काटेकोरपणे शिकवितो. आपल्यापैकी किती शिक्षक हे जाणतात की, तो आकृतीबंध म्हणजे वर्गाची किमान ज्ञानकक्षा असते. ती पात्रता धारण करत आपण त्या संदर्भातले कमाल देऊ शकतो. अगदी प्रश्नोत्तराच्या, घटक चाचणीच्या व विविध परीक्षांच्या चौकटीत फेर धरत शिकवणे किंवा परीक्षांचा खोखो खेळणे म्हणजे मुक्त ज्ञानसंवादास खो देणे असते. आपली पाठ्यपुस्तके ठरवून दिलेल्या ज्ञान उद्दिष्टपूर्तीची साधनं असतात. ती साधने प्रमाण मानून आपण पूरक साधनांकडे पाहात नाही, ज्ञानप्राप्तीचे विविध पर्याय सुचवत नाही. केवळ धड्याखाली दिलेले प्रश्न सोडवणे, यापेक्षा पूरक वाचन, स्वाध्याय, संदर्भ विकास महत्त्वाचा. ते कार्य जे शिक्षक अधिक जोमाने, जाणिवेने करतात ते विद्यार्थ्यांना सकस देतात. अन्नघटक (नत्र, पिष्ट, स्निग्ध, प्रथिने) आवश्यकच, पण जीवनसत्त्वे दिली तर कमतरतेची भरपाई जशी होते, तसेच शिक्षणातील त्रुटीचं आहे. कुशल अध्यापकच कमतरता भरून काढू शकतो. आज अभ्यासक्रम पूर्ण करणारे शिक्षक आहेत. काळाची गरज अभ्यासक्रम समजावण्याची, रुजवण्याची, त्याच्या उपयोजनावर भर देऊन विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व घडवण्याची, विकसित करण्याची आहे. विद्यार्थ्याला त्याच्या भविष्यात उठता बसता याची जाणीव व्हायला हवी, 'हे माझ्या शिक्षकांनी शिकवले, शिक्षकांनी हे करायचे नाही, याचा संस्कार दिलाय. असे करायला, वागायला, विचार करायला, कर्तव्य, मूल्य पाळायला शिक्षकांनी शिकवलेय.' ... असे घडेल तो सुदिन! मार्काच्या स्पर्धेत, शिष्यवृत्तीच्या शर्यतीत आपण खरे शिक्षण गमावून बसलो आहोत याचे भान शिक्षकांनाच आत्मपरीक्षणातून आले पाहिजे. सरकारी परिपत्रकांवर नाचणाऱ्या शाळा आपणाला नको आहेत. ती एक अनिवार्य वर्तमान व्यवस्था म्हणून तिचे पालन करत त्यापलीकडे डोकावणारे स्वप्रज्ञ मुख्याध्यापक आपणास हवे आहेत. मी वर्गशिक्षक असो की विषय शिक्षक, माझा वर्ग, माझे विद्यार्थी 'माझे' म्हणून ओळखले जाणे ही शिक्षकाची अस्मिता सुजाण समाज घडणीची नवी मागणी आहे. पालक पुरवठादार होत असताना शिक्षकांनी केवळ आज्ञा, सूचनांमध्ये अडकून न राहता तो मार्गदर्शक, समुपदेशक, साहाय्यक होईल तर पालकांचे तणाव व विद्यार्थ्यांवरील दबाव कमी होण्यास ते पूरक, साहाय्यक होईल. शिक्षक-पालक विद्यार्थ्यांचा सखा, सोबती, समर्थक व्हायला हवा.
 एकविसाव्या शतकाचे जे अध्यापनशास्त्र (Pedagogy) विकसित झाले

नवे शिक्षण, नवे शिक्षक/१७३