पान:नवे शिक्षण, नवे शिक्षक (Nave Shikshan , Nave Shikshak).pdf/173

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शिक्षकाची नवी अध्यापन कुशलता


 मित्रांनो अलीकडचे एक भाषण, माझ्या वाचनात आले. डॉ. निळकंठ रथ यांचे. डॉ. निळकंठ रथ हे भारताच्या महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाचे शिल्पकार असलेल्या डॉ. धनंजयराव गाडगीळ यांचे सहकारी, अर्थतज्ज्ञ. त्यांनी एका पुरस्कार वितरण समारंभात केलेल्या भाषणात वर्तमान शिक्षण व्यवस्थेवर भाष्य केले आहे. त्याचा घनिष्ठ संबंध शिक्षकांच्या अध्यापन विषयक भूमिकेशी, दृष्टिकोनाशी असल्याने तुमच्याबरोबर तो विचार वाटून घ्यावा असे वाटते. ते म्हणाले की, "आता माणसे विचार करत नाहीत. माणसे विचार करीत नाहीत ही सर्वसामान्य गोष्ट आहे, परंतु शिक्षण क्षेत्रातील जबाबदार घटकदेखील विचार करत नसतील, तर ती एक गंभीर समस्या आहे. अभ्यासक्रम तयार करणाऱ्या आणि अभ्यासक्रम शिकवणाऱ्या लोकांनी तरी किमान हा विचार करायला हवा की, प्रश्न सोडविण्यासाठी शिक्षण असते, त्यामुळे प्रश्न समोर ठेवून आपण काम केले पाहिजे. विचारशून्य शिक्षणाला काहीच अर्थ नाही. परंपरेला धरून काम करत राहणे आणि त्यानुसारच रथ चालवण्याला शिक्षण म्हणता येत नाही."
 परंपरेला छेद देणे म्हणजे जर शिक्षण असेल... आशय जर नवा असेल तर तो आशय शिकवण्याची पद्धत पण नवी हवी. हल्ली शिक्षणात सर्जनात्मकता, विद्यार्थी सहभाग, उपक्रमशीलता, तंत्रकुशलता यांना जर महत्त्व येत आहे तर हर्बार्टची पंचपदी, (पूर्वतयारी, सादरीकरण, संबद्धता, सामान्यीकरण) आपली अध्यापन पद्धती, शास्त्र (Pedagogy) राहणार की, एकविसाव्या शतकाचे नवे 4H, 3R आपण शोधून काढून शिकवणार? विचार कौशल्य, मूल्यमापन, पारदर्शिता, प्रश्नांची सोडवणूक, प्रकल्पाधारित शिकणे, आंतरशास्त्रीय अध्यापन विकास, ससंदर्भ अध्यापन युक्त आपली नवी अध्यापन पद्धती असायला हवी जिच्यात ज्ञानरचना, ज्ञाननिर्मिती संशोधन, जीवन शिक्षण व कालभान आहे.

नवे शिक्षण, नवे शिक्षक/१७२