पान:नवे शिक्षण, नवे शिक्षक (Nave Shikshan , Nave Shikshak).pdf/171

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

हेच ज्ञानविस्ताराचे साधन होते. दृक-श्राव्य साधन विकास, मुद्रण गती, प्रकाशन विस्तार, साधन वैविध्य यांमुळे बहुश्रुत कल्पनेत पाहणे, वाचणे, लिहिणे, ऐकणे या क्रियांचा समावेश कालौघात होत राहिला. त्यामुळे ज्ञान ग्रहण व प्रकटीकरण वैविध्यपूर्ण झाले. चित्रपट, ग्रंथ, संदर्भ, संशोधन, दूरदर्शन, मोबाईल्समधील ऍप, सॉफ्टवेअर्स, इ. संदर्भ हे सर्व आता शिक्षकाच्या बहुश्रुततेत सामावल्याने शिक्षकाची 'बहुदृकश्राव्यता' अशी नवीन संकल्पनाच उदयाला आली आहे. त्यावर नव शिक्षकाची अध्ययन, अध्यापन, संशोधन, लेखन, व्याख्यान, व्यासंग, छंद यातील उपक्रमशीलता व नावीन्य यांचे मूल्यमापन होत राहते. तंत्रज्ञानाच्या युगात माहितीचा विस्फोट झाल्याने 'निवडीचे तारतम्य' हेही नव शिक्षकाच्या उपक्रमशीलतेचा भाग होऊ पाहतो आहे. योग्य वेळी साधन, संदर्भाचा योग्य वापर हा नव्या युगाच्या हजरजबाबीपणा होतो आहे. हजरजबाबीपणाची जागा तत्परतेने घेतली आहे. असा तत्पर शिक्षक म्हणजे नव उपक्रमशील नवा शिक्षक होय.
संशोधन
 संशोधन (Research) हा ज्ञानविकासाचा मूळ पाया. आज 'आकृतीबंध' केवळ अभ्यासक्रमाचा राहिला नाही, तर एकूण शिक्षण प्रक्रियेचाच एक साचा, चौकट बनून राहिला आहे. ही चौकट शिक्षणास 'घाण्याचा बैल' बनवते आहे. पूर्वी तेल काढायचे घाणे (चरक) असत. त्याला बैल जुंपलेला असायचा. तो ठरावीक परीघात फिरायचा. तो कितीही फिरला, त्याने कितीही चकरा काढल्या तरी तो परीघातच. तसे शिक्षकाचे झालेय. तो अभ्यासक्रम, पाठ्यपुस्तके, घटक चाचण्या, गृहपाठ, पेपर, मूल्यमापन यात अंक देणारा अंपायर बनून गेला आहे. बरोबर किंवा चूक या दोन्ही अडकलेला शिक्षक विद्यार्थ्यांची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार विसरून गेला आहे. विद्यार्थी विकासात त्याची भूमिका 'मूक प्रेक्षक' अशी दयनीय झालीय खरी!
 पण याला छेद देत त्यानं स्वत:चा अवकाश निर्माण करून प्रयोग, उपक्रम, निष्कर्ष, संशोधन नि परत नवा प्रयोग अशी निरंतर संशोधन वृत्ती विकसित केली पाहिजे. नव्या काळात विद्यार्थी बहुभाषी झाला, पण लेखन, उच्चारण, शुद्धता गमावून बसला. उच्चारानुसारी लेखनामुळे दुसर्या, गिर्राहिक, अस्पृष्यता, पंचर, असे अशुद्ध लेखन रूढ होत आहे. 'गेम' शब्द 'तो' का 'ती' (स्त्रीलिंगी, पुल्लिंगी) काही कळेनासे झालं आहे. रस्त्यावरचे फलक 'पुढे शाळा आहे' का 'शाळा पुढे आहे' यातला फरक शिक्षकांनी नीट शिकवला नाही. भाषांतर कच्चे, व्याकरण कच्चे राहिले तर समाज कच्चाच

नवे शिक्षण, नवे शिक्षक/१७०