पान:नवे शिक्षण, नवे शिक्षक (Nave Shikshan , Nave Shikshak).pdf/169

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

देता यायला हवी. हल्ली तीर्थाटन म्हणजे सहल रूढ होते आहे. एकविसाव्या शतकात साहित्यिक, वैज्ञानिक, विद्यापीठे, वस्तुसंग्रहालये, नैसर्गिक ठिकाणे यावर भर हवा. नव्या काळात नासा या अमेरिकेच्या अवकाश केंद्रास सहल काढणाऱ्या शाळा आहेत. त्या श्रीमंतांच्या शाळा अशी भलामण, उपेक्षा उपयोगाची नाही. आपल्या प्राप्त परिस्थितीत शैक्षणिक सहल शैक्षणिकच व्हायला हवी. सहलीत दंगा, मस्ती, भेंड्या, खाऊ, खेळ, मुक्तपणा हवाच. हाताची घडी तोंडावर बोट, ओळ, बसा, चढा, उभे राहा, झोपा, जेवा म्हणजे सहल नव्हे. सहल म्हणजे सहज जिज्ञासापूर्ती, सहजआनंद, सहज शिक्षण, पण ते शिक्षकांसाठी प्रयत्न, नियोजन, कृती, कष्ट इत्यादीतूनच साध्य होणार.
स्नेहसंमेलन
 स्नेहसंमेलनांचा प्रारंभच झाला आहे तो विद्यार्थ्याच्या सुप्तगुणांच्या विकासासाठी. त्यासाठी पूर्वअट आहे विद्यार्थ्यांचे सुप्तगुण शिक्षकास माहीत असणे. आजची स्नेहसंमेलने 'रेडिमेड' होत आहेत. शिक्षकांनी ते जाहीर करायचे, फतवे काढायचे, पात्र विद्यार्थ्यांनी तयारी करायची व शिक्षकांनी फक्त शिट्टी मारून पडदा उघडायचा. नृत्य, नाटकातला मेकअप, पोशाख सारी जबाबदारी पालकांची. आज परिस्थिती असताना स्नेहसंमेलन फी भरून पालक भुर्दंड सोसत आहेत. काही शाळांतून स्नेहसंमेलनातून जिलेबीचे जेवण हाच मुख्य कार्यक्रम होतो आहे.
 स्नेहसंमेलनात प्रत्येक विद्यार्थ्याच्या गुणानुसार सहभागाचे नियोजन हवे काही कलाकार आणि काही प्रेक्षक असे विभाजन ..... शिस्त, कला, मेकअप, दिग्दर्शन, प्रदर्शन, रांगोळी, वाद्यवादन, नृत्य, नाटक, गायन, पटकथा लेखन, संवाद लेखन, सूत्रसंचालन सर्व विद्यार्थी करू शकतात, त्यासाठी अनेक दिवसांचे नियोजन, तयारी असेल तर ते उत्कृष्टच होणार. ज्या दिवशी पालक पाल्याचा गुणगौरव, कर्तृत्व पाहण्यासाठी पाहण्यासारखे सादर निमंत्रित म्हणून येतील त्या दिवशी ते विद्यार्थी-शिक्षकांचे स्नेहसंमेलन होणार. भाषण, गुणगौरव (पारितोषिक वितरण), सांस्कृतिक कार्यक्रम प्रदर्शन, प्रात्यक्षिके असे तुकड्या-तुकड्यांनी स्नेह संमेलन होईल तर विद्यार्थी सहभागी केंद्री होणार. अन्यथा ते 'चटावरचं श्राद्ध' म्हणून उरकले जाणारा प्रकार होईल. नव्या शिक्षकात नियोजन, शिस्त, दिग्दर्शन, कला, संगीत, क्रीडा, विज्ञान सर्वांत रुची व गती हवी. 'मी डाव्या अस्तनीचा शिंपी' म्हणण्याचा काळ केव्हाच लोटला आहे.

नवे शिक्षण, नवे शिक्षक/१६८