पान:नवे शिक्षण, नवे शिक्षक (Nave Shikshan , Nave Shikshak).pdf/164

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 थक्क होऊन जाल, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे शिक्षकांनी काय वाचावे? का वाचावे? कसे वाचावे महत्त्वाचे रंजक वाचन ही शिक्षकाची व्यक्तिगत गरज. पण व्यावसायिक गरजा म्हणाल तर त्यांचे वाचन, ज्ञान, विस्तार, जिज्ञासा, सूक्ष्मता, नवता यासाठीच हवे. त्याने नुसते वाचून चालणार नाही. विचार, आकलन, विश्लेषण, तर्क, चिकित्सा यातून त्याचे स्वत:चे आकलन तयार करणारे वाचन असेल, तर ते प्रगल्भ व उपयोजित. असं वाचन त्यास वर्गात शिकवताना आश्वस्त करते, आत्मबल देते. त्यांचे वाचन ग्रंथसूची (Bibliography) पासून संकेत स्थळ (Webliography) पर्यंत विस्तारणारे असेल ते अद्यतन (update). समाजास, नवा शिक्षक नेटवर वाचणारा, लिहिणारा, बोलणारा, शिकवणारा, संवाद करणारा, पत्रव्यवहार करणारा, संवाद करणारा, सूचना देणारा अभ्यासायला हवा.
 जी गोष्ट वाचन मंत्राची तीच वाचन तंत्राची पण. आता डीएनएचा नकाशा माणसाच्या हाती आल्यापासून जग माणसाच्या साक्षरतेविषयक संकल्पनेचीच पुनर्माडणी करू पाहातो आहे. त्यात साक्षरतेच्या भाषिक, दृश्य, अवकाशी (spatial) ऐतिहासिक, सांस्कृतिक, माहितीविषयक, राजकीय साक्षरतेच्या संकल्पनांवर भाष्य करू लागले आहे. त्यामुळे शिक्षकाच्या 'ई वाचनास' असाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. शिक्षकाची भाषिक साक्षरता पुस्तक वाचनावर न ठरता तो शिक्षक ऑनलाईन किती वाचतो, किती व्यापक विचार करतो. त्याला पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन येते का? तो एल. सी. डी. प्रोजेक्टर वापरू शकतो का? यावर ठरेल. त्याला ग्राफिक्सचं ज्ञान किती, तो संकेत चित्र ओळखू शकतो का? उच्चारण बारकावे त्याला येतात का? त्याचा वाचनाचा, उच्चाराचा, गतीचा आलेख आता दृश्य स्वरूपात पाहण्यास मिळतो. त्याची प्रत मिळते. त्यावर त्याची योग्यता ठरेल. शब्दांची सांकेतिकता, शब्दांच्या अर्थछटा, जुन्या शब्दांचे नवे संदर्भ (व्यवहारातील) त्याला माहीत आहेत का यावर त्याची भाषिक क्षमता व साक्षरता ओळखली, मोजली जाईल. डिजिटल इमेज, चॅट, आयकॉन, ग्राफ, व्हिडिओ इत्यादी त्याच्या भाषिक क्षमता विकासाची साधने होतील. हा त्याच्या वाचन, विचार व व्यवहाराचा अविभाज्य भाग असेल.
 शिक्षकाचे स्वत:चं ग्रंथालय, संगणक (लॅपटॉप) इंटरनेट कनेक्शन हवं. पेन तर हवाच, पण पेनड्राईव्ह, स्कॅनर, प्रिंटर हवा. या साऱ्याची किंमत मोटर बाइक (टू व्हिलर) पेक्षा कमी आहे. गाडी, माडी, महत्त्वाची की सीडी हे ठरवण्याची वेळ येऊन ठेपली आहे. शिक्षकाच्या घरी मराठी

नवे शिक्षण, नवे शिक्षक/१६३