पान:नवे शिक्षण, नवे शिक्षक (Nave Shikshan , Nave Shikshak).pdf/154

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 कधी काळी बोलणे आणि लिहिणे (Chalk and Talk) म्हणजे शिक्षण होतं. त्याचे स्थित्यंतर, विकास, रूपांतर होऊन आज जोडा आणि ओढा (Plug and Chug) उपसा, भूमितीच्या पटीने ज्ञान वितरण शिक्षणाचे तंत्र होऊन बसले आहे. शिक्षक प्रशिक्षण काळात गुंडाळी फळा, तक्ते, प्रतिदर्श (मॉडेल्स) प्रकल्प म्हणजे साधन विकास होता. एकविसाव्या शतकातील नवा शिक्षक संगणक साक्षर, मोबाईलवाला, टॅबवाला, स्मार्ट फोनधारक होणे जसे अपेक्षित आहे, तशीच शाळा संगणक लॅब, लँग्वेज लॅब, टचस्क्रीन बोर्ड, व्हर्च्युअल क्लासरूम, थ्रीडी क्लास रूम, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सुविधायुक्त, बायोमेट्रिक हजेरी घेणारी, ऑनलाईन प्रवेश परीक्षा घेणारी होणार ही आता अटळ गोष्ट आहे. त्यामुळे नव्या शिक्षकास नवी साधने आत्मसात करणे व नव्या पद्धतीने शिकवण्या-शिकवण्याच्या पद्धती आत्मसात करणे ओघाने आलेच.
 आजचे सारे शिक्षक मोबाईलधारक आहेत. अगदी वाडी, वस्तीवर शिकवणारा शिक्षकही बी.एस.एन.एलमुळे डोंगर कपारीत कुठेही असला तरी संपर्कात असतो, राहतो. काही सन्माननीय अपवाद असले तरी बहुसंख्य शिक्षक मोबाइल फोनधारी आहेत. (भारताची वर्तमान लोकसंख्या १,२२०, ८००, ३५९ आहे. पैकी ९०४, ४८0, 000, इतके मोबाईलधारक आहे. हे प्रमाण सुमारे ७५% इतकं होते, हे गृहीत धरू.) त्यांनी व विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर शैक्षणिक साधन म्हणून करायचे ठरवले तर चक्रावून जायला होतं. अगदी साध्यात साध्या मोबाईलचा वापर करून शिक्षक खालील कार्य करू शकेल.

नवे शिक्षण, नवे शिक्षक/१५३