पान:नवे शिक्षण, नवे शिक्षक (Nave Shikshan , Nave Shikshak).pdf/150

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शक्यता असलेला शिक्षक पण लेचापेचा असणार नाही.
 आता जग या डिजिटल नेटिव्ह जनरेशन (एकविसाव्या शतकातील उपजत संगणक साक्षर पिढीसाठी) नव्या आकृतिबंधाचा विचार करत आहे. नव्या विद्यार्थ्यांना तंत्र साधनांचे नवे पर्यावरण लाभले आहे. त्यामुळे ही पिढी न शिकवता बऱ्याच गोष्टी स्वयंशिक्षणाने शिकते. उदाहरणच सांगायचे झालं तर तुमच्या हातातल्या (शिक्षकांच्या) मोबाइल्सचा, रिमोटचा वापर जितका विद्यार्थी करू शकतात, तेवढा शिक्षक करू शकत नाही. व्हिडिओ गेम्स कोणतेही आई-वडील मुलांना शिकवत नाहीत. टू व्हिलर, फोर व्हिलर मुले कोणत्याही ड्राइव्हिंग स्कूलमध्ये जाऊन शिकत नाहीत. ती उपजत स्वयंशिक्षित पिढी आहे. हे आता तुमची इच्छा असो, नसो मान्य करायला हवे. तिची अपेक्षा शिक्षक, पालकांकडून एकच आहे. आम्हाला जिज्ञासेचे नवे मार्ग सांगा. (Please give us the way of Curiosity) आता शिक्षक, पालकांचे एकच कर्तव्य नव्या काळात उरलेय, ते म्हणजे आपण जे करू शकलो नाही तो अवकाश, संधी मुलांना-विद्यार्थ्यांना मिळवून देणे.
 गणित, इंग्रजी, विज्ञान, समाजशास्त्र शिकवणे म्हणजे नव्या पिढीचा विचका (Mess-Maths, English, Science, Social Science) करणे ठरत आहे. मग काय शिकवले पाहिजे नव्या पिढीला? काय गरज आहे नव्या पिढीची? त्यांना हवाय नवा विचार, नवे तत्त्वज्ञान, नवी नाती, नवी ग्रहण पद्धती, विचार, कृती, संबंध व संपादन हे नव्या शिक्षणाचे नवे गाभे गाभा घटक ठरू पाहात आहेत. त्यांना उद्देश्य, साधने, कृती, उपाययोजना, निष्कर्ष अशी जुनी अध्यापन पद्धती गैरलागू ठरते हे शिक्षकांनी लक्षात घ्यायला हवे.
 या बदलत्या पर्यावरणात शिक्षकाची भूमिका बदलेल तरच तो एकविसाव्या शतकाची आव्हाने पेलू शकणार. म्हणून जगभर नव्या शिक्षकाची नवी भूमिका, क्षमता, अपेक्षांबाबत वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिलं जात आहे. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे शिक्षकाची बदललेली भूमिका. ती स्वीकारायला अवघड आहे खरी, पण आता पर्याय राहणार नाही. आत्तापर्यंत शिक्षक, विद्यार्थ्याला जग दाखवायचा, त्याचे डोळे उघडायचा, त्याला दृष्टी द्यायचा; आता शिक्षकाने विद्यार्थ्यांच्या नजरेतून जग पाहण्याची, समजून घेण्याची

नवे शिक्षण, नवे शिक्षक/१४९