पान:नवे शिक्षण, नवे शिक्षक (Nave Shikshan , Nave Shikshak).pdf/147

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शिक्षकाच्या नव्या पात्रता


 लोकसाहित्यातून मिळणारे शहाणपण औपचारिक शिक्षणातून येत नाही, असा माझा अनुभव आहे. हिंदीत एक प्रश्नात्मक लोकोक्ती आहे. 'घोडा क्यों अड़ा? पान क्यों सड़ा?' अशीच काहीशी. कोणता घोडा अडेलतट्ट बनतो? ज्याला सारखं पळायची सवय केली जात नाही तो. खाऊचे पान विकणारा तांबोळी. त्याला चांगले माहीत असते की गड्डीत ठेवलेली पानं सारखी फिरवावी लागतात, नाही तर ती डागाळतात, कुजतात. भाकरी फिरवली नाही की करपते. आंब्याची आढी वरखाली केली नाही की, एका आंब्यामुळे (कुजलेल्या) सारी आढी नासते. शिक्षकांच्या पात्रतेचे पण असेच आहे. ती सतत वाढवली नाही की कुचकामी, कालबाह्य ठरते. मला हे आठवायचे कारणही तसेच आहे.
 आपल्याकडे शिक्षक प्रशिक्षण, पात्रतेचेही असेच आहे. एक तर ते सुमार असते. दुसरे कालबाह्यही. शिक्षकांची पात्रता, प्रशिक्षण निश्चित करणारी आपणाकडे एक राष्ट्रीय संस्था आहे. राष्ट्रीय अध्यापक शिक्षण परिषद (National council for Teacher Education) (NCTE) तिचे नाव. ती केंद्राच्या अखत्यारीत काम करते. ती व्यवस्थित काम करत नसल्याने देशात गुणवत्ताधारी शिक्षक निर्माण होत नाही म्हणून सर्वोच्च न्यायालयाने भारतातील अध्यापक शिक्षणाचा (Teacher Education) अभ्यास करून सुधारणा सुचविण्यासाठी न्यायमूर्ती वर्मा आयोगाची नेमणूक २०१० वर्षात केली होती. त्या नियुक्तीचे कारणही तसेच गंभीर होते. एनसीटीईच्या पश्चिम विभागीय कार्य समितीने सन २०१०-११ या वर्षी एकदम २९१ शिक्षण शास्त्र महाविद्यालयांना परवानगी दिली होती. मागणी, पुरवठा,

नवे शिक्षण, नवे शिक्षक/१४६