पान:नवे शिक्षण, नवे शिक्षक (Nave Shikshan , Nave Shikshak).pdf/135

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

चक्रव्यूह भेदण्याचा प्रश्न


 मी गेली काही वर्षे शिक्षण या विषयावरचं नवं वाचत वर्तमान भारतीय शिक्षण जग जाणून घेण्याचा प्रयत्न केला. माझ्या लक्षात आलेली गोष्ट अशी की भारतीय शिक्षणाचे प्रमुख सहा घटक आहेत - १) विद्यार्थी २) पालक ३) शिक्षक ४) समाज ५) संस्थाचालक ६) शासन.
 वर्तमान भारतीय शिक्षण जागतिकीकरणाच्या रेट्यामुळे नियंत्रित व्यवस्थेकडून स्वायत्त व्यवस्थेकडे वाटचाल करत आहे. केंद्र व राज्य सरकारची विकासासंबंधीची मानसिकता कल्पना कल्याणाकडून निर्गुंतवणूकीकडे अग्रेसर आहे. त्यातून विना अनुदानित खासगी, स्वायत्त शिक्षण रचना अस्तित्वात येते आहे. कधी काळी शिक्षणावर ३% खर्च करणारे शासन दुप्पट तरतूद करत ६% पर्यंत येऊन पोहोचले आहे. आपण क्षमतेपेक्षा अधिक खर्च करतो याचा सरकारला कोण अभिमान ? पण शासनास या गोष्टीचा विसर पडतो की जे देश स्वत:चा विकास म्हणजे मनुष्यबळ विकास मानतात, ते शिक्षणावर १५% खर्च करतात. खरं तर शिक्षण विकासातून शासनाने घेतलेला काढता पाय हा या देशातील वंचित समाजावर केलेला अन्याय आहे. शासनाचे शिक्षणातील निर्गुंतवणूकीकरणाचे धोरण हे सरळ सरळ भांडवलधार्जिण्या खासगी संस्थांचे उखळ पांढरे करण्याचे धोरण आहे. देशातील अधिकांश शिक्षण संस्था या काँग्रेस व भाजप प्रणित आहेत, त्यातही अधिकांश राजकीय लोकप्रतिनिधी व पक्ष पुरस्कृत आहेत, त्यांचा प्रवास ध्येयाकडून धंद्याकडे सुरू आहे. समाजात वाढलेल्या आकांक्षा, आर्थिक स्तराचे उंचावणे, वैश्विक संपर्क (जगाचे जवळ येणे), ज्ञान क्षेत्र व समाजात ज्ञानभाषा म्हणून इंग्रजीचे वाढते वर्चस्व, परिणामी समाज मनाचे (पालकांचे) मातृभाषेकडून इंग्रजीकडे

नवे शिक्षण, नवे शिक्षक/१३४