पान:नवे शिक्षण, नवे शिक्षक (Nave Shikshan , Nave Shikshak).pdf/127

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

लागले. हे धेडगुजरी अध्यापन होते, ते लक्षात आल्यावर बालवाडीपासूनच इंग्रजी माध्यमाचे शिक्षण अपेक्षिणारा पालक वर्ग तयार झाला. यातून भारतभर इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे पेव फुटले.
 पण यामागे जागतिकीकरणाचे भान पालकांना होणे, हे महत्त्वाचे कारण होते. दरम्यानच्या काळात इंग्रजी ही आंतरराष्ट्रीय भाषा म्हणून मान्यता पावली होती. संगणक क्रांतीने इंग्रजीचे महत्त्व अधोरेखित केल्याने चीन, जपान, फ्रान्स, जर्मनीसारखे भाषिक, कट्टर देशही इंग्रजी माध्यमाचे शिक्षण पुरस्कृत करू लागले. बौद्धिक संपदेची भाषा इंग्रजी बनली. पर्यटनाने, विशेषत: विदेशी पर्यटनात जागतिकीकरणाने वाढ झाली. त्यातून इंग्रजीच्या सार्वत्रिकरणाचे भान सर्वसामान्यास झाले. पण सर्वांत मोठी अनुभूती दिली ती मोबाईलने. या साधनाने खरे तर जागतिकीकरण सर्वदूर पोहोचवले.
 एके काळी शाळा-महाविद्यालय इंग्रजी हे अनुवाद पद्धतीने शिकवले जायचे. आज प्रथम भाषा व प्रत्यक्ष पद्धती, संरचना पद्धती (Structural Method) ने शिकवले जाते. शिवाय संवादी कौशल्यावर भर दिल्याने सर्वसामान्य विद्यार्थ्यांतील इंग्रजीचा न्यूनगंड कमी झाला. जागतिकीकरणाने सर्व भाषांचे इंग्रजीकरण करण्याचा झपाटा लावल्याने दैनंदिन भाषा व्यवहारात इंग्रजीचे वाढते आक्रमण प्रादेशिक भाषा प्रदूषित करीत आहे. नवी पिढी घरी मातृभाषा बोलते, टी.व्ही.वर हिंदी कार्यक्रम पाहते, शाळेत इंग्रजी शिकते. त्यामुळे ती त्रैभाषिक झाली आहे. तिला एकही भाषा धड येत नाही. 'मी डायनासोर पाहून डरलो' अशी वाक्ये सर्रास ऐकायला येणे, त्याचेच प्रतीक होय. वृत्तपत्रांनी तर भाषा प्रदूषणाचा विडाच उचलल्याची स्थिती आहे, त्यात इलेक्ट्रॉनिक माध्यमे (टी.व्ही आणि इंटरनेट, गुगल) मागे नाही. मोबाईलची भाषिक ऍपस् सदोष आहेत. 'दुसऱ्याला' शब्द 'दुसर्याला' लिहिणे भाग पडते. वर्तमानपत्रांचे सदोष मथळे 'उच्च शिक्षणाची फी दामदुप्पट' यात फी व दाम दोन्हीचा अर्थ एकच आहे, हे संपादकांच्याही लक्षात येत नाही. त्यामुळे जागतिकीकरणात इंग्रजीचा आग्रह सावध हवा. भाषिक प्रयोग जबाबदार हवेत. शिवाय स्थानिक भाषा, बोली, संस्कृती टिकली नाही तर उद्याची पिढी 'धोबी का कुत्ता न घर का न घाट का' अशी त्रिशंकू झाल्याशिवाय राहणार नाही.
२. सार्वत्रिक शिक्षणाकडून खासगीकरणाकडे
 स्वातंत्र्यानंतर भारताने शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाचे धोरण अवलंबून स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत शिक्षण प्रसार सुरू केला. स्वातंत्र्यपूर्व

नवे शिक्षण, नवे शिक्षक/१२६