पान:नवे शिक्षण, नवे शिक्षक (Nave Shikshan , Nave Shikshak).pdf/119

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

असे त्रिस्तरीय पर्याय उपलब्ध करून दिल्यास मनुष्यबळ विकासाचे धोरण गतिमान होऊ शकेल व प्रत्येक हात मिळवता बनवता येईल.
 स्वातंत्र्याच्या गेल्या ६७ वर्षांत माध्यमिक शिक्षण विकासाची गती अन्य स्तरीय विस्तार पाहता मंद रहिली आहे. स्वातंत्र्याच्या प्रारंभी ७००० माध्यमिक शाळा होत्या. ती संख्या सुमारे २३% वाढून आता १७३ हजार इतकी झाली आहे (२००७). शिक्षक संख्याही साहजिकपणे वाढली असून ती २१२७ हजार झाली आहे. शिक्षक : विद्यार्थी प्रमाण २१ चे ३५ होणे हे माध्यमिक शिक्षण गुणवत्तेपुढचे आव्हान आहे. शिक्षक : विद्यार्थी वाढत्या विषम प्रमाणामुळे व्यक्तिकेंद्री विकासाचे तत्त्व केवळ कल्पना बनून राहते. जग गुणवत्तेत गुंतले असताना आपण पटसंख्येच्या पाठीमागे लागून राहतो आहोत. राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानात आपला सारा भर संख्या वाढ व भौतिक सुधारणांकडे आहे. विकासशील देशापुढे एकाच वेळी संख्या व गुणवत्तेचा संघर्ष असतो. पण या संघर्षात जे विषयी होतात तेच विकसित देश ठरतात. हे लक्षात घेऊन मर्यादांसह गुणवत्ता संवर्धनास भारतास पर्याय उरत नाही.
 युनेस्को प्रकाशित 'ग्लोबल एज्युकेशन डायजेस्ट-२०११' नुसार १९७० च्या तुलनेने विद्यार्थी नोंदणी जगभर तिप्पट झाली आहे. बहुसंख्य देशांत माध्यमिक शिक्षण पूर्ण झालेल्या मुला-मुलींच्या पदवीधर होण्याची शक्यता वाढताना दिसते. शिक्षक संख्येत ५०% वाढ दिसून येते. मुलींच्या संख्येतील वाढ उत्साहवर्धक आहे. जगात कॅनडाचा माध्यमिक शिक्षणात वरचष्मा असून तिथे ९५% विद्यार्थी सार्वजनिक (Public) शाळात प्रवेश घेतात हे विशेष. जी-८ देशांच्या गटात कॅनडाचा विद्यार्थ्यांवर होणारा शिक्षणाचा दरडोई खर्च सर्वाधिक आहे. तेथील माध्यमिक शाळांत सन १९८० पासून शिक्षणासाठी म्हणून विदेशी विद्यार्थ्यांची संख्या प्रतिवर्षी वाढते आहे. समृद्ध शैक्षणिक परिसर, साधन संपन्नता, शिक्षणाचा वैश्विक दर्जा, इंग्रजीतून अध्यापन, पर्यवेक्षित गृहनिवास ही तेथील वैशिष्ट्ये विद्यार्थ्यांना जगभरातून आकर्षित करीत आहेत. माफक दरात उच्च दर्जाचे माध्यमिक शिक्षण देणारा देश म्हणून जग कॅनडाकडे पाहते. इ. १ ली १२ वी पर्यंतचे शिक्षण शालेय मानले जाते. ते सार्वजनिक शाळातून दिले जाते. त्या सर्व शाळा मानांकित असतात. शासनमान्य पात्र शिक्षकच नेमले जातात. सार्वजनिक निधी (अनुदान)तून शाळांचे संचालन होते. कॅनडात सार्वजनिक माध्यमिक शाळा बरोबर खासगी आणि स्वतंत्र (स्वायत्त) माध्यमिक शाळा आहेत, पण सार्वजनिक कल अनुदानित शाळांकडे आहे.

नवे शिक्षण, नवे शिक्षक/११८