पान:नवे शिक्षण, नवे शिक्षक (Nave Shikshan , Nave Shikshak).pdf/118

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

असतात. फिनिश विद्यार्थी गणित, विज्ञानात जगात अव्वल असतात. प्राथमिक शिक्षकास आठवड्याचा कार्यभार २४ तास इतका असतो, शिक्षक सेवांतर्गत प्रशिक्षणावर विशेष भर असतो. विद्यार्थी, शिक्षक व शाळांचे निरंतर मूल्यमापन, मूल्यांकन होत असते. त्रुटीच्या भरपाईवर सूक्ष्म लक्ष व अंमलबजावणीच्या धोरणामुळे गुणवत्ता वर्धनात सातत्य येते, संशोधनास महत्त्व देण्यात येऊन नित्य सुधारणा हे यांच्या परिपाठाचाच एक भाग होऊन गेला आहे. शाळेत भिन्नजिनसी (सर्व प्रकारच्या बुद्धिमत्तेचे) विद्यार्थी गट असतात, हुशार वेगळे व ढ वेगळे ('अ' तुकडी, ‘फ' तुकडी) प्रकार नाही. त्याऐवजी 'प्रत्येक विद्यार्थी केंद्र' असे धोरण आहे, पदव्युत्तर शिक्षक प्राथमिक शाळेत सर्रास आढळतात. शिक्षक वृत्ती ही निवडाचा निकष मानली जाते (शिकण्या, शिकवण्यात रस). विद्यार्थी समुपदेशन अनिवार्य मानले जाते, संख्या नियमित व गुणवत्ता नियंत्रित असे प्रशासनिक तंत्र आहे. आरोग्य, आहार, स्वच्छता, नियमितता, समृद्ध ग्रंथालय, प्रयोगशाळा, साधन समृद्धी या किमान गोष्टी अनिवार्य मानल्यामुळे सर्वांना समान दर्जाचे गुणवत्ताप्रधान प्राथमिक शिक्षण देणे फिनलंडला साधले आहे.
माध्यमिक शिक्षण
 'सर्व शिक्षा अभियान'च्या तथाकथित यशानंतर बाराव्या पंचवार्षिक योजनेच्या वर्तमान काळात आता देशात राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान राबवले जात आहे. 'सक्तीचे मोफत प्राथमिक शिक्षण कायदा -२००९' मुळे इ. १ ली ते ८ वी चे शिक्षण प्राथमिक होते आहे. परिणामी, इयत्ता ९ वी व १० वी अशा दोनच वर्षांचे माध्यमिक शिक्षण महाराष्ट्रात राहते आहे. इयत्ता ११ वी व १२ वी स उच्च माध्यमिक दर्जा आहे. निम्न माध्यमिक व उच्च माध्यमिक अशा चार वर्षांच्या परंतु द्विस्तरीय विभागणीस सामोरे जाणाऱ्या माध्यमिक शिक्षणाच्या अभ्यासक्रमासंबंधी पुनर्रचनेचा विचार आता अटळ आहे. शिवाय जागतिकीकृत शिक्षणाशी समायोजित होण्याची संधी म्हणून या पुनर्रचनेकडे भारत पाहील तर १६ ते २० वयोगटातील किशोर व युवकांना आपणास रोजगार प्रधान व तंत्रकुशल असे मनुष्यबळ विकसित करण्याची ती संधी असेल. देशाच्या गरजेनुसार युवकांचे कुशल तंत्रज्ञ, कुशाग्र बुद्धिमंत असे वर्गीकरण व विभाजन करून आज सर्रास व्हाइट कॉलर (बेरोजगार) बनणाऱ्या युवा पिढीस रोजगारक्षम बनवणे शक्य होईल. विद्यार्थी कलमापन, समुपदेशन, क्षमतानिहाय विद्याशाखा, अभ्यासक्रम निवडण्याचे व त्यांना प्रमाणपत्र, पदविका, पदवी

नवे शिक्षण, नवे शिक्षक/११७