पान:नवे शिक्षण, नवे शिक्षक (Nave Shikshan , Nave Shikshak).pdf/117

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

(वायुविजन, प्रकाश, पाणी, वीज, साबण, टॉवेल्स, स्वच्छता इ. सुविधा असलेली.) अजून शाळात शारीरिक शिक्षा दिल्या जातात. युनिसेफच्या अहवालातून लक्षात येणारे चित्र आपल्या प्राथमिक शिक्षणापुढची खरी आव्हाने (Key Challenges) आहेत.
 या पार्श्वभूमीवर 'फिनलंड मॉडेल' भारताने अभ्यासावे, अनुकरण करावे असे आहे. 'पिसा' या जगमान्य संस्थेने हे मान्य केले आहे. 'The Programme for International Student Assessment' (PISA), 'The Organisation for Economic Co-operation and Development (OECD)' सारख्या मानांकन व मूल्यमापन करणाऱ्या संस्थांच्या क्रमवारीत फिनलंड, दक्षिण कोरिया, सिंगापूर, जपान, हाँगकाँगसारखे छोटे देश अमेरिका, रशिया, भारत अशा महासत्ता घोष करणाऱ्या देशांच्या कितीतरी पुढे आहे. महाराष्ट्र स्वतंत्र राज्य म्हणून उदयाला आले तेव्हा म्हणजे सन १९६० मध्ये फिनलंड पारंपरिक शिक्षण देणारा देश होता. सन १९७० मध्ये फिनलंडने शिक्षणाकडे लक्ष द्यायचे ठरवून देशातल्या प्रत्येक मुलास उगवता तारा (Stellar) मानले. मातृभाषेतून शिकण्याचा अधिकार दिला. फिनिश, स्वीडिश, सामी भाषांतून मुले शिकतात. देश छोटा पण शाळांची संख्या ३०००. शिक्षण व संस्कृती मंत्रालय प्राथमिक, माध्यमिक शाळा विकासाचं कार्य करते. विशेष म्हणजे या शाळा स्थानिक स्वराज्य संस्थाच चालवतात, त्यांचे राष्ट्रीय शिक्षण मंडळ आहे. ते शिक्षण धोरण, अभ्यासक्रम, परीक्षा पद्धती ठरवते व नियंत्रितही करते. अधिकांश शाळा सार्वजनिक असून त्या नगरपालिकांकडून त्यांच्याच निधीतून चालतात. अवघ्या १.५% शाळा खासगी आहेत.
 सहा पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यास पहिलीत प्रवेश मिळतो. त्यामुळे ती शिक्षण घेण्यास प्रगल्भ असतात, असा विचार आपण करायला हवा. आपल्याकडे कमी वयात अधिक शिक्षण देण्याची प्रथा मुलांवर अन्याय करणारी आहे. सहा वर्षांचे शालेय शिक्षण असते. वर्ग शिक्षकच शिकवतात म्हणजे एकच शिक्षक सारे विषय शिकवतो. सर्व शाळांचा अभ्यासक्रम समान असतो. इयत्ता ७ वी ते ९ वीत ऐच्छिक विषय निवडले जातात. मातृभाषा व साहित्य विषयांतर्गत इंग्रजी, स्वीडिश किंवा फिनीश अशा दोन भाषा मुलं अनिवार्यतः शिकतात. शिवाय गणित, पर्यावरण (आरोग्य, भूगोल, वनस्पती शास्त्र, भौतिक शास्त्र, रसायनशास्त्र) धर्म अथवा नैतिक शिक्षण, इतिहास व समाजशास्त्र, कला, हस्तव्यवसाय व क्रीडा, गृह अर्थशास्त्र असे विषय असतात. काही ऐच्छिक (विज्ञान, कला)

नवे शिक्षण, नवे शिक्षक/११६