पान:नवे शिक्षण, नवे शिक्षक (Nave Shikshan , Nave Shikshak).pdf/115

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

बालसंगोपन केंद्र तिथलं ते वात्सल्य आपल्या बालवाडीत केव्हा प्रतिबिंबित होणार ? 'सेंटर डिपार्टमेंटल दी इन्फरन्स' ही अजून माझ्या लक्षात आहे. जपानमध्ये 'मेगुरो केश्फु रो', 'एयुमीएन' संस्थातील मतिमंद, मूक-बधिर मुलांच्या संस्थांतील बालवाड्यांतील विद्यार्थी सुविधा, विद्यार्थी संख्येपेक्षा अधिक शिक्षक, शिक्षिका, डॉक्टर, काळजीवाहक पाहिले की 'बाल्य' ही अधिक संवेदनेने हाताळण्याची (Handle with care) गोष्ट आहे हे पटल्याशिवाय राहात नाही. काच वस्तूंच्या वेष्टनांवर लिहिलेलं हे वाक्य मला बालवाडीचे ब्रीद वाटत आलेय ! इंग्लंडमधील बालवाड्या तर पूर्ण शासकीय साहाय्यावरच चालतात. ती शासन आपली प्रथम व प्रधान (First and Prime) जबाबदारी मानते यातच सारे आले. तेथील बहुतांश बालवाड्या मला प्राथमिक शाळेस जोडलेल्या आढळल्या. इटलीतील बालवाड्या फ्रान्सच्या धर्तीवर चालताना मी अनुभवल्या आहेत. तिथले बालशिक्षण हे 'बालक हक्क' प्रमाण मानून विकसित करण्यात आले आहे. सिंगापूरमधील बालवाड्यांची स्पर्धा चीनशी दिसून आली.
प्राथमिक शिक्षण
 भारतातील प्राथमिक शिक्षणाचा मूलाधार म्हणजे गुरूकुल शिक्षण पद्धती. घोकंपट्टी, संथा, श्रवण, स्मरण, वाचन, अंकन म्हणजे शिक्षण असा एक काळ होता. ब्रिटिश आमदानीत त्याचे पाश्चात्यीकरण झाले. राष्ट्रीय शाळा, व्हॉलंटरी स्कूल्स सुरू झाली. स्वातंत्र्यानंतर अनुदानित शिक्षण व्यवस्था आली. शिक्षण ही शासनाची जबाबदारी अशी मानसिकता असलेल्या भारतीय समाजास विना अनुदान शिक्षण पद्धतीने धक्का देऊन शिक्षणासाठी पैसे मोजण्याची मानसिक तयारी पालकांना प्रथम इच्छेविरुद्ध करावी लागली. पण जागतिकीकरणाने विदेशी इंग्रजी शिक्षण संस्थांच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे लोण खेडोपाडी पोहोचले. भारती विद्यापीठ, डी. वाय. पाटील विद्यापीठ सारख्या संस्थांनी प्रथम उच्च व व्यावसायिक शिक्षण पदरच्या खर्चाने करण्याची मानसिकता निर्माण केल्यावर त्या जोरावर व्हिबग्योर, रिलायन्स, प्रेमजी, अंबानी, पोद्दार आदी उद्योगांनी कंझ्युमर्स मॉलबरोबर एज्युकेशनल मॉल्सही 'नॉलेज सिटी' या गोंडस नावाखाली सुरू केले. परिणामी ५ रुपये फीत बालवाडी शिक्षण देणारा हा देश आता बालवाडीला पाच हजार ते पाच लाख डोनेशन देताना दिसतो. तिकडे दुसरीकडे 'सर्व शिक्षा अभियान' खेडोपाडी रुजून प्रत्येक मूल शाळेत आणण्याची जीवघेणी धडपड शिक्षकांना करावी लागते आहे. प्रसंगी खिचडी खिलवून, शिजवून पट सांभाळण्याची सर्कस वाडी-वस्तीवर

नवे शिक्षण, नवे शिक्षक/११४