पान:नवे शिक्षण, नवे शिक्षक (Nave Shikshan , Nave Shikshak).pdf/114

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

करण्यात येत असून हाँगकाँगसारखा छोटे बेट असलेला देश बालशिक्षणात आघाडीवर आहे.
 हाँगकाँग सरकारची अभ्यासक्रम परिषद (The Curriculum Development Council) आहे. ती पूर्व प्राथमिक शाळा (बालवाडी) साठी 'Guide to the Pre-primary Curriculum' प्रकाशित करते. ते वाचले की लक्षात येते, तिथे आजीवन शिक्षण (Lifelong Learning) या तत्त्वावर ते उभे आहे. म्हणजे पोपटपंची त्यांना अपेक्षित नाही. आपणाकडे पाल्याच्या अक्षरज्ञान, अंकज्ञान बडबडीने पालकांना मोक्ष मिळतो. व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास हे त्यांचे बालशिक्षणाचे उद्दिष्ट आहे. हाँगकाँगमध्ये पालकांना पहिला शिक्षक मानले जाते. शिक्षकाचे स्थान नंतर. त्यामुळे पालक बालशिक्षणात सक्रिय सहभागी असतात. बालवाडीस ते समाज, देशाची छोटी प्रतिकृती मानतात. कुटुंब व समाजास जोडणारा सेतू म्हणून ते बालवाडीकडे पाहतात. शिक्षकाची समज व मुलाचे शिकणे या गोष्टी ते महत्त्वाच्या मानत असल्याने प्रगल्भ शिक्षक निवड व नियुक्तीवर भर असतो. प्रत्येक मुलास प्रवेश हे त्याचे लक्ष्य आहे. सृजन, निर्मितीस शिक्षणात प्राधान्य दिले जाते. खेळातून सहज शिकवण्याकडे शिक्षकांचा कल असतो, शिक्षणात रस निर्माण व्हावा म्हणून शिक्षक सर्व ते प्रयत्न, उपाय, पर्याय चोखाळत असतात. मी २०११ साली हाँगकाँगमध्ये होतो तेव्हा मल्टिमिडिया, मिडिया लर्निंग, व्हिडिओ लर्निंग, नेचर सुप्रीम, इनोव्हेशन, क्रिटिकल थिंकिंग, इमॅजिनेशन असे शब्द बालवाडीतील शिक्षिका वापरत होती. थ्रीडी क्लास, व्हर्च्युअल लर्निंगचे त्याचे नियोजन सुरू होते. इतकी आधुनिक बालवाडी मी पाहात होतो पण त्या शिक्षिकेस आपण मुलांना अत्याधुनिक देऊ शकत नसल्याची खंत, अपराधी भाव मला सतत अस्वस्थ करत होता. चिनी, इंग्रजी भाषा समान शिकवण्यावर त्यांचा भर दिसला. शासन नियंत्रण करते व साहाय्यही करते. प्रशिक्षित शिक्षक नियुक्ती अनिवार्य आहे. 'पर्वत चढा तरच जग दिसणार' असे उच्च ध्येय ते बालवाडीतच अंगिकारत असल्याने प्रत्येक विद्यार्थी सुजाण नागरिक बनवण्याचे उद्दिष्ट हाँगकाँग प्राप्त करू शकला. शाळानिहाय अभ्यासक्रम भिन्न व शिक्षण पद्धती भिन्न असली तरी किमान शिक्षण, कौशल्य, अभ्यासक्रम बंधनातून सुटका कुणालाच नसते.
 सन १९९० ला युरोपच्या दौ-यावर असताना फ्रान्सच्या मेझ (Metz) सारख्या छोट्या गावातील अनाथाश्रमातील समृद्ध बालवाडी पाहिली, 'असोसिएशन डी इन्फरमेशन एट डी एन्टाइड मोझेल' संस्थेतील ते खरे

नवे शिक्षण, नवे शिक्षक/११३