पान:नवे शिक्षण, नवे शिक्षक (Nave Shikshan , Nave Shikshak).pdf/113

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

व्यक्तिकेंद्री व व्यक्तिविकासास प्राधान्य देणारे शिक्षण भारतापासून कोसो दूर आहे.
 २०११ च्या जनगणनेनुसार भारतात सहा वर्षे वयोगटातील बालकांची संख्या १५८ दशलक्ष आहे. सुमारे ५ लक्ष बालवाड्या ग्रामीण भागात आहेत. त्यात २६.४५ दशलक्ष मुले-मुलीच शिक्षण घेतात. पूर्व प्राथमिक शिक्षणाची टक्केवारी २०% च्या आत आहे. पूर्व प्राथमिक शिक्षकाची विविध प्रशिक्षणे उपलब्ध असून ती दोन आठवडे ते दोन वर्षे कालावधीची आहेत. पात्र पूर्व प्राथमिक शिक्षक अपवादाने आढळतात. या संदर्भात क्रिएट-२०१०, युनिसेफ 'वर्ल्ड स्टेट ऑफ चिल्ड्रन-२०१३' (http://WWW.unicef.org/sowc2013) अहवाल वाचले तरी भारतीय बालशिक्षणाचे विदारक चित्र अस्वस्थ करण्यास पुरेसे आहे. मॅट्रिक पास शिक्षिका, एक आया, एक पाण्याचा पिंप आणि एक लाकडी फळा व घोडा घेऊन चालणाऱ्या बहुसंख्य बालवाड्या हे भारतीय बालशिक्षणाचे सरासरी चित्र आहे.
 या पार्श्वभूमीवर जगातील पूर्व प्राथमिक शिक्षण समजून घेणे उद्बोधक ठरेल, पूर्व प्राथमिक शिक्षण जगभर बालवाडी, अंगणवाडी, बालमंदिर, माँटेसरी, किंडरगार्टन, प्री-के, ग्रेड झिरो, हेड स्टार्ट अशा अनेक नावाने ओळखले जाते, २+ ला ते सुरू होते, ६+ वयापर्यंत चालते. वाचन, लेखनाचा प्रारंभ इतक्या माफक अपेक्षेने हे शिक्षण पूर्वी घरोघरी आईच द्यायची. पण आईच्या घराचा उंबरा ओलांडण्याच्या गरजेने हे शिक्षण औपचारिक रूप धारण करत गेले, औद्योगिक क्रांतीमुळे स्त्री कमावती झाली व तिच्या मुलांच्या व अनाथ अपत्यांच्या शिक्षणाचा प्रश्न जगास भेडसावू लागला. त्यातून जॉन फ्रेडरिक ऑबर्लिनने सन १७७९ मध्ये पॅरिस (फ्रान्स) मध्ये जगातील पहिली बालवाडी सुरू केली, ती 'Infant School' नावाने. ऑबर्लिनच्या मतानुसार पाळण्यातील मूलही शिक्षणक्षम असते, चूक की बरोबर, लहान-मोठे, अंधार-प्रकाश ते ओळखते, या शिक्षणास शास्त्रशुद्ध बनवले ते रॉबर्ट ओवेननी. त्याने बालशिक्षण पद्धती (Pedagogy) चा पाया रचला तो सन १८१६ मध्ये. गेल्या सुमारे २०० वर्षात बालशिक्षण विकसित झाले. आज पूर्व प्राथमिक शिक्षणात व्यक्तिगत लक्ष, व्यक्तिमत्त्व विकास, संवाद कौशल्य, सामाजिकरण, समूह जीवन, जीवन कौशल्ये, ऐकणे, बोलणे, गाणे, नाचणे, वर्गीकरण करणे, रंगसंगती, आरोग्य सवयी, खेळ, मनोरंजन, मल्टिमिडिया, व्हिडिओ गेम्स, शारीरिक शिक्षण, सर्जनशीलता, पंचज्ञानेंद्रिय विकास आदी घटक घेऊन अभ्यासक्रम तयार

नवे शिक्षण, नवे शिक्षक/११२