पान:नवे शिक्षण, नवे शिक्षक (Nave Shikshan , Nave Shikshak).pdf/112

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

भागाकार व वजाबाकीची बाब न राहता ती गुणाकार व बेरजेची गोष्ट बनते आहे. खेडोपाडी इंग्रजी शाळांचा विकास, नगरपालिका, जिल्हा परिषदांच्या शाळांपेक्षा खासगी शाळांना पसंती, कुटुंबाच्या आर्थिक अंदाजपत्रकात शिक्षणाचा सिंहाचा वाटा, प्रत्येक भारतीयाचे मोबाईल, संगणकधारी होण्याची मनीषा, विदेशात स्थायिक होण्याची स्वप्ने ही केवळ उच्चभ्रू समाजाची मिरासदारी न राहता प्रत्येक भारतीयाची आंतरिक ओळख होणे यातच भारताच्या जागतिक होण्याची बीजे सामावलेली आहेत. उद्याचा भारत शिक्षण, तंत्रज्ञान, मनुष्यबळ, ग्राहक क्षमता, मूलभूत सुविधा विकासाच्या जोरावर जगातला प्रगत देश होणे ही अटळ गोष्ट झाल्याने भारतात पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक, उच्च, विद्यापीठीय शिक्षणही जागतिक होत आहे, पण या प्रवासात विषमता, साधन अभाव व शासन धोरण अडथळे बनून रोखत आहेत.
पूर्व प्राथमिक शिक्षण
 शालेयपूर्व शिक्षण म्हणजे पूर्व प्राथमिक शिक्षण. तीन ते पाच वर्षे वयोगटाचे शिक्षण, जगात मात्र ते दोन ते सात वर्षांपर्यंत दिले जाते. देशनिहाय या शिक्षणाचा वयोगट व कालावधी भिन्न आहे. या शिक्षणाबद्दल भारताचे धोरण, अभ्यासक्रम, वयोगट, सक्ती असे सार्वत्रिक रूप नाही. २०१२ साली भारत सरकारने जाहीर केलेले 'Early Child Care and Education Policy' (http://icds-wcd.nic.in/schemes/ECCE/ccce01102013eng.pdf ) हे प्रकाशन वाचले की लक्षात येते की भारत सरकारला बाळ-बाळंतीण सुखरूप ठेवण्यात अधिक रस आहे. २००२ साली भारतीय संसदेने केलेली ८६ वी घटना दुरुस्तीही याचीच री ओढते. प्राथमिक व सक्तीच्या शिक्षण अधिकाराचा सन २००९ चा कायदा ६ ते १४ वयोगटातील इ. १ ली ते ८ वी पर्यंतची जबाबदारी घेतो, पण पूर्व प्राथमिक शिक्षणाबद्दल ब्र काढत नाही.
 खेड्यापाड्यात, पाडे नि वस्त्या, झोपडपट्टीधमील अंगणवाड्या, बालवाड्या यांची स्थिती दयनीय आहे. भारतात खासगी बालवाड्याच काय तो जनतेचा खरा आधार. त्यांची जागा आता 'प्ले स्कूल्स' घेत आहेत. तिथे पोषाख, इमारत, साधन संपन्नता म्हणजे आधुनिक शिक्षण असा भारतीय पालकांचा समज असल्याने भौतिक व दिखाव्यावर भर दिसून येतो. पाल्य रिक्षा, बसमधून टाय, टिफिनसह जातो, यातच पालक खूष. शाळेत इंग्रजी व घरी मातृभाषिक व्यवहार असे भारतीय चित्र असल्याने हाँगकाँग, फिनलँड, सिंगापूर, दक्षिण कोरिया, चीन सारखे समृद्ध

नवे शिक्षण, नवे शिक्षक/१११