पान:नवे शिक्षण, नवे शिक्षक (Nave Shikshan , Nave Shikshak).pdf/108

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

लॅपटॉप नेटनी जोडायचे, दप्तराचे ओझे गुल ! टिफीन, वॉटर बॅगची जबाबदारी शाळेची, मध्यान्ह भोजन व शुद्ध पाण्याची गॅरंटी दिली की झाले. मुलांनी हात हलवत जायचे नि डोके भरून परतायचे. शाळेत दिलेले होमवर्क घरच्या पीसीवर फॉरवर्ड करायचे, घरी केलेला अभ्यास शाळेतल्या पीसीवर किंवा शिक्षकांच्या / शाळेच्या सीपीयूवर फॉरवर्ड करायचा. मला माहीत आहे, भारत गरीब आहे, पण दरिद्री नाही हे तर मान्य करू या. कल्पनादारिद्र्य जाणे महत्त्वाचे. साधने जोडणे एकविसाव्या शतकात पूर्वीच्या तुलनेने सोपे झाले आहे. भारताचे दरडोई उत्पन्न वाढत आहे.
 नवे तंत्रज्ञान तुमचे वेळ, श्रम, पैसा वाचवायलाच जन्माला आले आहे, याबाबत आज शहाण्या माणसाला शंका राहिलेली नाही. रिक्षा, बस येणार म्हणून लहान मुलांनी झोप टाकून, मारून उठायचे. रिक्षा, बस येणार म्हणून पंधरा ते वीस मिनिटे अगोदर रस्त्यावर येऊन उभं राहायचे. आता याची गरज उरली नाही. रिक्षा, बसमध्ये जीपीएस बसवा. घरी मोबाईलवर कळते बस, रिक्षा केव्हा येणार ते. शिवाय, समान गुणवत्तेच्या व समान समृद्ध शाळांचे आश्वासन आपण जोवर शासनाकडून मागणार नाही, 'सर्वांना समान शिक्षणाची शाश्वती मिळवणे' म्हणजे घराशेजारी मुले शिकणे. नियोजन, नीती, तरतूद यात दृष्टी नसल्याने आपण कोणकोणत्या दिव्यांना तोंड देत आहोत, हे शक्य नाही का? सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची हमी देणे शक्य नाही का? प्रत्येकाची वाहने वाचली तर रस्त्यावर गर्दी, ट्रॅफिक जाम टाळता नाही का येणार? आपण थोडासा असा 'अविचार' करायला नको का शिकायला ?
 खेड्यापाड्यात आता अगदी जिल्हा परिषदांच्या शाळांतूनही डिजिटल एज्युकेशन नाही का सुरू झालेले ? आज ते अपवाद, प्रायोगिक असेल. ठरवले तर का नाही आपण ते सार्वत्रिक करायचे ? एक बाई, एक लाकडी घोडा, एक पाण्याचा पिंप, एक गुंडाळी फळा, १०'x१०' ची खोली आणि ५० मुले म्हणजे बालवाडी ही कल्पना आपण पुसणार की नाही? २० मुले, तीन शिक्षिका, दोन काळजीवाहक, तीन खोल्या, वीस डेस्कटॉप्स, स्मार्ट बोर्ड, म्युझिक सिस्टिम, एलसीडी, छोट्या-टेबल खुर्च्या, प्रसाधनगृह, विश्रांती कक्ष (शिक्षकांसाठी नव्हे, विद्यार्थ्यांसाठी) स्वयंपाकघर, स्टोअर, खेळणी, बाग, मैदान, थ्रीडी क्लास, डीव्हीडी, सीडीज्, का नाही समृद्ध बालवाडीचे स्वप्न बाळगायचे ? साखर कारखाने, पतसंस्था, दूध डेअरी, सूत गिरणी, खासगी उद्योगांना आपल्या परिसरात पाच-दहा लाख रुपये खर्चून अशी बालवाडी करणे अशक्य आहे का? गेस्ट हाऊस बंद करून,

नवे शिक्षण, नवे शिक्षक/१०७