पान:नवे शिक्षण, नवे शिक्षक (Nave Shikshan , Nave Shikshak).pdf/107

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

उद्याचे तंत्रज्ञानाधारित शिक्षण


 मी आजवरचे गंभीर गमतीने लिहायचे ठरवलेय. 'मी-एस्.एम.' नावाचे एक आत्मचरित्र परवा मी काही संदर्भानी वाचत होतो. त्यात साथी एस्. एम्. जोशींनी त्यांच्या कोकणातील गोळप गावी त्यांना शाळेचे वय झाल्यावर 'धूळपाटीवर बसवले' असा उल्लेख आहे. म्हणजे पूर्वी वाळू, मातीनी भरलेल्या पाटावर बोटाने अक्षर काढायला शिकवत. मग पाटी पेन्सील आली. मग पेन, वह्या आल्या आणि आता कंप्युटर, टॅबलेट, किंडल, लॅपटॉप आला. म्हणजे आता अक्षर आणि अंकाचे ज्ञान होणं महत्त्वाचे. अक्षर, अंक गिरवायची गरज राहिली नाही. आताची जी I-Kid Generation आहे तिला की-बोर्ड वापरता आला, टंकन करता आले की झाले. गणिताचे म्हणाल तर गणिताची चिन्हे +, -, X, ÷, ०.० कळले की झाले. म्हणजे कॅलक्युलेटर वापरायचा कसा हे शिकवणे आजची गणिती गरज आहे, त्यासाठी हातचा शिकवण्याची गरज नाही, अशा अनेक जुन्या गोष्टी तंत्रज्ञान इतिहास जमा करत निघाले आहे, हे आपण लक्षात घेऊन नव्या बाल शिक्षणाची मांडणी, आखणी करायला हवी.
 एकीकडे पालक, शिक्षण तज्ञ दप्तराच्या ओझ्याबद्दल बोलत आहेत नि दुसरीकडे राजकीय पक्ष आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात मोफत टॅबलेट, लॅपटॉप देण्याच्या गप्पा करत आहेत. पण शाळा स्वत:हून पुढाकार घेऊन 'शाळा' नि 'घर' wi-fi ने जोडण्याचा प्रयत्न करताना दिसत नाही. सोपे आहे (महाग असले तरी !) विद्यार्थ्यांचा शाळेतला टॅब शाळेने द्यायचा, घरचा टॅब किंवा लॅपटॉप पालकांनी घ्यायचा. दोन्ही टॅब किंवा

नवे शिक्षण, नवे शिक्षक/१०६