पान:नवे शिक्षण, नवे शिक्षक (Nave Shikshan , Nave Shikshak).pdf/10

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

दुसऱ्या सुधारित आवृत्तीच्या निमित्ताने


 'नवे शिक्षण, नवे शिक्षक' या पुस्तकाची पहिली आवृत्ती ऑक्टोबर, २०१६ मध्ये प्रकाशित झाली होती. चार महिन्यातच त्याची दुसरी सुधारित आवृत्ती प्रकाशक प्रकाशित करीत आहेत. हे शिक्षण क्षेत्रातील सुचिह्न होय. पहिली आवृत्ती हातोहात खपली याचे श्रेय दक्षिण महाराष्ट्र शिक्षण संस्था, बेळगाव, श्री शिवाजी शिक्षण संस्था, बार्शी, कोल्हापूर जिल्हा माध्यमिक व उच्चमाध्यमिक मुख्याध्यापक संघ, कोल्हापूर या संस्थांनी मोठ्या संख्येने पुस्तक खरेदी करून ते आपल्या संस्थांच्या प्रत्येक शाळा, महाविद्यालयात जाईल असे पाहिले. इतकेच नव्हे तर सदर पुस्तक प्रत्येक शिक्षक वाचतील अशी व्यवस्था त्यांनी केली. हे या पुस्तकाच्या आशय व विचाराचे यश होय. प्राचार्य डी. एन्. मिसाळे, काकतकर महाविद्यालय, बेळगाव यांनी आपल्या महाविद्यालयाला उत्कृष्ट 'नॅक' मानांकन मिळाल्याच्या आनंदाप्रित्यर्थ हे पुस्तक वाचून आपल्या सर्व सहकाऱ्यांना भेट दिले. संजय कांबळे हे केवळ वाचन प्रसारार्थ व्याख्यानमाला, मेळावे, परिसंवाद इ. ठिकाणी जमीनीवर पुस्तके पसरवून विकतात. आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येक शिक्षक वाचकास या पुस्तकाचा मलपृष्ठ मजकूर (ब्लर्ब) वाचायला लावून पुस्तक विकत घेण्याची प्रेरणा देत खेड्या-पाड्यात १०० पुस्तके पोहोचवतात. काही संस्था आपल्या शिक्षक, प्राध्यापकांसाठी केवळ या पुस्तकावर शैक्षणिक शिबिरे घेतात. दैनिक 'सकाळ'ने या पुस्तकाचे महत्त्व ओळखून आपल्या 'सप्तरंग' पुरवणीत परिचय देऊन सदर पुस्तक महाराष्ट्रभर पोहोचवले. शिक्षण हा आपल्या समाज आणि संस्कृतीत किती महत्त्वाचा घटक मानला जातो, हे यावरून स्पष्ट होते.