पान:नवे शिक्षण, नवे शिक्षक (Nave Shikshan , Nave Shikshak).pdf/२०२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 जगभर शिक्षण व शिक्षक या दोन्ही गोष्टींकडे फार गांभीर्याने पाहिले जाते. जगातले सारे प्रगत देश विकास करताना आपणास दिसतात ते शिक्षण धोरणातले सातत्य, देशाचं विकास लक्ष्य, मनुष्यबळ विकासाचे नियोजन यामुळे. लोकानुनय करणारे शैक्षणिक निर्णय घेणे जोवर आपण थांबवणार नाही तोवर शिक्षण व शिक्षकांचे अध:पतन आपणास थांबवता येणार नाही. सिंगापूर, फिनलंडसारखे छोटे देश शिक्षणात जागतिक परिमाणे (स्टँडर्ड) निर्माण करतात तर आपणासारख्या खंडप्राय देशाने ते का करू नये? महासत्ता बनण्याचे स्वप्न असायला हरकत नाही. त्यासाठी राजकीय लाभापलीकडे देशाहित म्हणून शिक्षणाकडे पाहायला हवे.
 शिक्षक दिनी ज्या शिक्षकांना पुरस्कार दिले जातात. तो एक फार्सच म्हणायला हवा. मी जिल्हा, राज्य, राष्ट्रीय स्तरावर आदर्श शिक्षक निवड समितीत काम केलं आहे. सारे शासकीय आदर्श शिक्षक पुरस्कार हे प्रस्ताव मागवून त्यातून निवड करून दिले जातात. जो शिक्षक आपला प्रस्ताव चकचकीत (ग्लेज्ड) सादर करतो, तो आदर्श शिक्षक होतो. त्यातही मंत्री, संत्री यांच्या चिठ्ठया-चपाट्यांची भरती असतेच.
 हे चित्र बदलायचे असेल तर खालील सुधारणांना पर्याय नाही.
 १. खासगी, शासकीय, निमशासकीय सर्व शिक्षण संस्था मान्यता, शिक्षक पात्रता, निवड, वेतनमान यासाठी एकच व समान धोरण व संहिता हवी.
 २. शिक्षणावरील आर्थिक तरतूद राष्ट्रीय उत्पन्नाच्या किमान ६% असावी. ती योजने गणिक वाढवत नेऊन १०% करावी.
 ३. विना अनुदान शिक्षण पद्धती त्वरित बंद करून सर्व शिक्षकांना सन्मानजनक समान वेतन व समान सेवाशर्ती लागू कराव्यात.
 ४. शिक्षकांची पदोन्नती, वेतनवृद्धी ही सेवाकाल, सेवा ज्येष्ठता या ऐवजी सेवा श्रेष्ठतेवर (काँपिटन्स) वर दिली जावी.
 ५. सेवा कालात लेखन, वाचन, वक्तृत्व, समाजसेवा संशोधन, प्रकल्प, प्रकाशन, इत्यादीस महत्त्व देऊन पुरस्काराऐवजी प्रोत्साहनपर वेतनवृद्धीचे तत्त्व अंगीकारावे.
 ६. वर्गातील शिक्षक व विद्यार्थी प्रमाण बालवाडी ते उच्च शिक्षण स्तरावर जागतिक परिणामानुसार निश्चित करावे. (युनेस्को स्टँडर्ड)
 ७. सेवांतर्गत प्रशिक्षणात निरंतरता, गुणवत्ता, तज्ज्ञता यांना महत्त्व देण्यात यावे.

नवे शिक्षण, नवे शिक्षक/२०१