पान:नवे शिक्षण, नवे शिक्षक (Nave Shikshan , Nave Shikshak).pdf/१९६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

असतात. त्यासाठी शिक्षकास चार वर्षे पदवी प्रशिक्षण असते. आणखी एक वर्ष प्रशिक्षण घेतले की, त्याला पदव्युत्तर प्रमाणपत्र (एम्. एड.) प्राप्त होते. या काळात शिक्षकांचे ध्येय उंचवण्यावर, विस्तारण्यावर भर दिला जातो. त्यांच्या ज्ञानपिपासा वाढवली जाते. निसर्गाचे गूढ त्याला समजावले जाते. निरंतर नव्या क्षमता, कौशल्य स्वीकारायची वृत्ती शिक्षकात विकसित करण्यावर भर दिला जातो. तो संवेदनशील राहावा असा प्रयत्न असतो. शिक्षकाचे चरित्र व्यक्तित्व नैतिकतेच्या पायावर उभारले जाते. शिवाय तो व्यावसायिक असायलाच हवा हेही पाहिले जाते. त्यासाठी समाज संपर्क, समाज सहभाग, समाज संवाद असा त्रिविध गोफ गुंफला जातो. विविध मान्यवरांच्या भेटी, संवाद, मुलाखती, कार्य, वाचन असे नानाविध उपक्रम प्रशिक्षण काळात योजले जातात. प्रशिक्षण काळात प्रशिक्षणार्थीना विविध सामाजिक उपक्रमात सहभागी व्हावे लागते. शिक्षकाला जबाबदार काळजीवाहक (care-taker, Steward) बनवण्यावर भर दिला जातो. आपल्या प्रशिक्षणात यातील कितीतरी गोष्टींचा अभाव खटकतो.
 शिक्षक, प्रशिक्षण काळात विचारशील वृत्ती विकास, अध्यापन कौशल्ये (Pedagodical Skills), लोक प्रशासन व व्यवस्थापन कौशल्य, स्वयंव्यवस्थापन कौशल्य, प्रशासन कौशल्य, संवाद कौशल्य, तंत्र कौशल्य, नवोपक्रमशीलता, सामाजिक व भावनिक बुद्ध्यांक वाढ इत्यादी कौशल्य वर्धनावर भर दिला जातो. यातून कुशल शिक्षक घडतो. कौशल्य वर्धनाबरोबर शिक्षण, प्रशिक्षण कालावधीत प्रशिक्षण छात्राध्यापकाच्या ज्ञान-विज्ञानाच्या कक्षा रुंदावणे, ते चतुरस्र करणे याला अत्याधिक महत्त्व दिले जाते. त्याअंतर्गत स्वशोध (क्षमता व कमतरतांचे भान), विद्यार्थी जाणीव बोध, समाजभान, विषयज्ञान, अध्यापनशास्त्र, शैक्षणिक धोरण, अभ्यासक्रम, बहुसांस्कृतिक साक्षरता (ही तर आपल्या देशासाठी काळाची गरजच!) जागतिकीकरण : स्वरूप आणि परिणाम, पर्यावरण जागृती इत्यादीचे ज्ञान, प्रशिक्षक, छात्राध्यापकास अनिवार्यपणे दिले जाते.
 पदवी पातळीवरच्या प्रशिक्षणात व्यावसायिक कौशल्यवर्धन, शिक्षक व्यक्तिमत्त्व विकास, प्रशासन व व्यवस्थापन तंत्र, प्रभावी व्यक्तिमत्त्वाची घडण यावर भर असते तर पदव्युत्तर स्तरावर प्रकल्प, संशोधन, संदर्भ यास महत्त्व असते. शिक्षक होण्यासाठी पदवी शिक्षण अनिवार्य असते. प्रशिक्षण एक वर्ष, दीड वर्ष, दोन वर्ष असे त्रिस्तरीय असते. एक वर्ष प्रशिक्षण पूर्ण करून तुम्हाला शाळेत नेमले जाते. सहा महिने वरिष्ठ शिक्षकांच्या

नवे शिक्षण, नवे शिक्षक/१९५