पान:नवे शिक्षण, नवे शिक्षक (Nave Shikshan , Nave Shikshak).pdf/१९५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शिक्षक प्रशिक्षण महाविद्यालयांशी कसलाही संबंध, संवाद नाही. शिक्षण विभागाचे स्वतंत्र संशोधन नाही. सिंगापूरच्या उपरोक्त अहवालात सहा महत्त्वाच्या सुधारणा व शिफारशी करण्यात आल्या असून त्यातून नव्या शिक्षक घडणीची त्यांची धडपड व संकल्पना स्पष्ट होते. त्यातून आपण बरेच शिकता येण्यासारखे आहे.
 १. नवे मूल्य, कौशल्य आणि ज्ञान (V3sk) तिथले अध्यापक शिक्षण, प्रशिक्षण एका विशिष्ट तत्त्वज्ञानावर उभे आहे. ते तत्त्वज्ञान आकृतीबंध, अध्यापन (आविष्करण) व सुधारणा सर्वांना लागू असते. त्यामुळे शिक्षकाचा सकारात्मक विकास, कौशल्यवर्धन, शिक्षकाची खोली, उंची, रुंदी, वाढ, विकास, कौशल्यवर्धन, सुधार सर्वात एक निरंतरता, सातत्य आढळतं. एकविसाव्या शतकाची आव्हाने पेलण्याच्या त्यांनी या पूर्वअटीच मानल्यात हे विशेष.
 नव्या शिक्षकात तीन मूल्यांचा (V3) ते आग्रह धरतात. (१) विद्यार्थी केंद्री मूल्य (२) शिक्षक व्यक्तिमत्त्व मुल्य (३) व्यावसायिक सेवा व समाज मूल्य, यानुसार शिक्षक घडणीचा केंद्रबिंदू विद्यार्थी असतो. सारं करायचे ते विद्यार्थ्यासाठी हे प्रशिक्षण काळात बिंबवले जाते. ते प्रशिक्षणार्थी युवक छात्राध्यापक (Trainee Teacher) असतात. त्यांना विद्यार्थ्यांची काळजी कशी करावी, त्यांचा विचार कसा करावा, अध्यापनातला आशय विद्यार्थ्यापर्यंत पोहोचायचे म्हणजे काय, त्याचे महत्व काय आहे, शिकणं म्हणजे नक्की काय असते, ते प्रभावी कसे करता येईल, त्याला वातावरण, साधनांची जोड कशी द्यायची, त्यातून अध्यापन परिणाम कसा घडतो, वाढतो हे सूक्ष्मरित्या शिकवले जाते. शिकण्या-शिकवण्याच्या कौशल्याबरोबर, नव्या शतकाची आव्हाने पेलण्याची कौशल्ये शिक्षक व्यक्तिमत्त्वात विकसित करण्यावर भर दिला जातो. तद्वतच शिक्षकात सेवाभाव व समाजशील वृत्ती विकासावर लक्ष केंद्रित केले जाते. विद्यार्थ्याविषयी बंधुभाव व प्रीती महत्वाची. ती शिक्षकात निर्माण केली जाते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सर्व विद्यार्थी शिकू शकतात, सर्वांत ग्रहण क्षमता (कमी, अधिक) असते. यावर भर दिला जातो. प्रत्येक विद्यार्थ्यातील सुप्त गुणांच्या विकासाचे कौशल्य शिक्षकात विकसित केले जाते. प्रत्येक मूल वेगळे आहे, प्रत्येकाची क्षमता, कमतरता, बलस्थान भिन्न आहे. हे शिकवण्यावर प्रशिक्षणात दिलेला भर म्हणजे वर्गातील सर्व विद्यार्थ्यांच्या विकासाचे राष्ट्राला दिलेले आश्वासन असते. या प्रशिक्षण धारणा व प्रयत्नांमुळे तेथील शिक्षक व्यवसायाशी, कर्तव्याशी एकनिष्ठ, समर्पित

नवे शिक्षण, नवे शिक्षक/१९४