पान:नवे शिक्षण, नवे शिक्षक (Nave Shikshan , Nave Shikshak).pdf/१९४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

संकल्प (21st Century LeamersCall for 21st Century Teachers) सोडला. त्यातून त्यांनी शिक्षक प्रशिक्षणाचा एक आदर्श कार्यक्रम आखला. तो प्रशिक्षण कार्यक्रम जगासाठी अनुकरणीय वस्तुपाठ (Role Model) ठरला असल्याने तो आपण समजून घेतला पाहिजे. आपल्याकडेही राष्ट्रीय अध्यापक शिक्षण परिषद (NCTE) असून तिनेही आपल्या डी. एड्. (डी.टी.एड्.), बी. एड्., एम. एड. पदव्या देणाऱ्या महाविद्यालयांच्या शैक्षणिक गुणवत्तेसंबंधी न्यायमूर्ती वर्मा समितीचा अहवाल (Vision of Teacher Education in India Quality and Regulatory Perspective-2012) प्रकाशित झाला असून तोही जिज्ञासूंनी वाचायला हवा.
  नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन, सिंगापूरने Model of Teachers Education for the 21st Century CTE21 नावाने प्रसिद्ध केलेला सुमारे सव्वाशे पानी अहवाल मुळातूनच शिक्षक, पालक, संस्थाचालक आणि हो, शिक्षणाधिकाऱ्यांनीही वाचायला हवा. या अहवालात एकविसाव्या शतकातील शिक्षकांचे व्यावसायिक ज्ञान व कौशल्य वाढीवर भर देण्यात आला आहे. जागतिकीकरणामुळे जो नवा ज्ञान समाज (Knowledge Society) आकारतो आहे. त्यातून भविष्यलक्ष्यी जी आव्हाने ध्यानी येतात ती गृहीत धरून हा अहवाल तयार करण्यात आला असल्याने त्याचे काळासंदर्भातील महत्त्व असाधारण आहे. एकविसाव्या शतकापुढे नव्या पिढीच्या नैतिक, बौद्धिक, शारीरिक, सामाजिक व निसर्ग पर्यावरण संदर्भातील जाणीव व सौंदर्यविषयी दृष्टिकोनाने मुक्त अशा सर्वांच्या व्यक्तिमत्त्व विकासाचे आव्हान आहे. जबाबदार नागरिक म्हणून विद्यार्थ्यांची घडण करताना त्यांना नव ज्ञान-विज्ञान, तंत्रज्ञान, नवी साधने यांची माहिती असणे, ते वापरण्याचे कौशल्य आत्मसात करणे व नव्या ज्ञानसमाजाचा घटक बनवणे आज आवश्यकच नाही तर अनिवार्य झाल्याचे भान या अहवालात प्रतिबिंबित आहे. या पार्श्वभूमीवर एकविसाव्या शतकातील शिक्षकाची कर्तव्ये व जबाबदाऱ्या बदलत असल्याने त्या पार पाडायची, पेलण्याची क्षमता शिक्षकांत निर्माण करणे राष्ट्राचे आद्य कर्तव्य झाल्याची जाणीव सदर अहवाल देतो.
 जबाबदार शिक्षकाची घडण ही राष्ट्राचे शिक्षण मंत्रालय, शिक्षक, प्रशिक्षण महाविद्यालये व शाळा, महाविद्यालये यांची संयुक्त जबाबदारी सिंगापूर मानते. आपणाकडे या तीनही घटकात असलेला समन्वय, नियंत्रण व कार्यवाहीविषयक अभाव असल्यामुळे शिक्षक प्रशिक्षणाकडे अक्षम्य दुर्लक्ष आहे. आपल्याकडे विद्यापीठात शिक्षण विभाग आहेत, पण त्यांचा

नवे शिक्षण, नवे शिक्षक/१९३