पान:नवे शिक्षण, नवे शिक्षक (Nave Shikshan , Nave Shikshak).pdf/१९३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

एकविसाव्या शतकाच्या शिक्षकाची घडण


 शिक्षणाची गुणवत्ता ही शिक्षकांच्या गुणवत्तेवर अवलंबून असते. जगातील फिनलंड, सिंगापूरसारखी छोटी राष्ट्रे शैक्षणिक गुणवत्तेत अव्वल दिसतात. कारण ते शिक्षक घडणीकडे काळजीपूर्वक लक्ष देतात. जगामध्ये श्रेष्ठ शिक्षक प्रशिक्षण देणाऱ्या ज्या संस्था आहेत त्यात 'नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन' सिंगापूरचा क्रमांक वरचा लागतो. त्याचेही एक कारण आहे. ते म्हणजे ही संस्था नानयांग टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीशी संलग्न असून विद्यापीठीय संशोधन व साधन सुविधांवर ती उभी आहे. एकविसावे शतक सुरू झाल्यावर सिंगापूरच्या असे लक्षात आले की, हे शतक ज्ञानाधारित अर्थशास्त्राचे आहे, माहिती व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात गतीने बदल होत आहेत. संपर्क साधनांच्या विकासाची गती अनपेक्षित व आश्चर्यकारक आहे. त्यामुळे शिक्षण क्षेत्राकडून विशेषतः पालक व विद्यार्थ्यांकडून नव्या शतकाचे प्रश्न सोडविणारे शिक्षण अपेक्षित असून तशी मागणी वाढते आहे. 'मागणी तसा पुरवठा' हे कोणत्याही व्यवसायाचे त्रिकालाबाधित सूत्र होय. ते असेल तरच तुम्ही टिकणार, याचे भान असलेल्या या संस्थेने एकविसाव्या शतकाचे पहिले दशक सरत आले असताना सन २००८-२००९ मध्ये शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रमाचे पुनर्मूल्यांकन करून त्यात सुधारणा करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सन २०१२ पर्यंत पंचवार्षिक योजना तयार करण्याचे ठरले.
  'विचारी शिक्षक' (Thinker Teacher) निर्मिती हे त्यांच्या शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रमाचे (Teacher's Training Programme) कायमचे ध्येय असल्याने त्यांनी एकविसाव्या शतकातील विद्यार्थ्यांच्या स्वप्न आणि अपेक्षांची पूर्तता करणाऱ्या एकविसाव्या शतकाची आव्हाने पेलणारे शिक्षक तयार करण्याचा

नवे शिक्षण, नवे शिक्षक/१९२