पान:नवे शिक्षण, नवे शिक्षक (Nave Shikshan , Nave Shikshak).pdf/१९२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

रिकाम्या हाताने (व डोक्याने पण) वर्गात जाऊ नये. वर्गात गेल्यावर विद्यार्थ्यांनी वरील साहित्य आणायला पाठवू नये. वैयक्तिक कामे लावू नयेत. शैक्षणिक साधनांचे नियोजन (निवड, वापर इ.) हवे. पूर्वतयारी (शारीरिक, मानसिक, साधनविषयक) महत्त्वाची.
 वरील विवेचनाकडे 'टीका' म्हणून न पाहता 'टिप्स' म्हणून पाहावे अशी माझी विनंती राहील. जगातील शिक्षक व भारतीय शिक्षक यांच्या भूमिकेतच मूलभूत फरक आहे. जगात शिक्षक व्यवसाय आहे. आपणाकडे शिक्षक धर्म, वृत्ती, संस्कार आदर्श, प्रतिदर्श (Role Model) आहे. कालौघात 'गुरुजी' हा 'सर', 'मॅडम' झाला तरी भारतीय जनमानसात शिक्षकाची प्रतिमा आणि प्रतिभा एखाद्या योगी, तपस्वी, उपदेशक, प्रवचकातीत राहिली आहे. विद्यार्थ्यांच्या दृष्टीने शिक्षकाचे महत्त्व प्रसंगी आई-वडिलांपेक्षा अधिक असते. संस्कार, प्रभाव, विचार, अनुकरण, आदर्श याचा मोठा पगडा विद्यार्थ्यांवर असतो, तो पालकांपेक्षा शिक्षकांचा. हे अतिरिक्त दायित्व या व्यवसायावर असतेच. याचा शिक्षकास विसर पडता नये. तुम्ही चांगले शिकवायला हवे हे खरेच, पण तुम्ही चांगले दिसायला नि असायलाही हवे अशी समाजाची अपेक्षा खोटी नाही. शिक्षणतज्ज्ञ डॉ. जे. पी. नाईक ध्येयवादी व कृतिशील शिक्षकांच्या चर्चासत्रात असे म्हणाले होते की, "शिक्षकांनी विधवेसारखे असायला हवे." त्याचा अर्थ होता समाज कितीही बदफैली होऊ दे. विधवा व्रतस्थ, नैतिक, समाधी जीवन जगत असते. समाज तिच्यावर अन्याय करत असतो, तरी ती आपली नैतिक प्रतिदर्श भूमिका व्रतस्थपणे बजावत राहते. आज आपण एकविसाव्या शतकातील जागतिक स्पर्धेत अग्रेसर आहोत. जग भारतीय शिक्षकांना प्राधान्याने निवडते ते त्यांच्या नैतिक मूल्यनिष्ठ चारित्र्य सामर्थ्यावर, बुद्धी इतकेच महत्त्व आज मूल्यांना येते आहे. भारतासारखा तुलनेने गरीब देश शिक्षकांना मात्र भरभरून देताना दिसतो. मग शिक्षकांचे समाजाप्रती काही देणे घेणे असेल तर त्याची उतराई त्याने अपेक्षापूर्तीने नको का करायला?

•••

संदर्भ :-
 1. Teaching as a profession - Session V (Essentiats of Teacher Personality) www.het.gov.pk
 2. The Definative Book of Body Language - Allan and Barbara Pease (Pease Renternational PTY Ltd. Australia)

नवे शिक्षण, नवे शिक्षक/१९१