पान:नवे शिक्षण, नवे शिक्षक (Nave Shikshan , Nave Shikshak).pdf/१९१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तलम नकोत. फिकट रंग तुम्हास सोज्वळ बनवतात. रंगसंगतीचे (Matching) भान हवे. नट, नटी, विदूषक, बहुरूपी होणे टाळावे. पोषाख नीटनेटका, टाचलेला हवा. फॅशन नको. पोशाख अंगास साजेसे हवेत. ढिले, ओंगळ मागून घातले असे वाटू देऊ नये. पोशाखात खोच, निऱ्या, कॉलर, पीन, पदर यांचं महत्त्व खबरदारीचे हवे. तुम्ही सुस्वरूप तर दिसायला हवे, पण चित्त चळेल असा पोशाख नसावा. पोशाख स्वच्छ, नेटका, इस्त्री केलेला हवा, पण 'कडक लिनन' नको. शाळेचा गणवेश असेल तर त्याचे पालन हवे. पुरुषांचे पोशाख उशीचा अभ्रा नको, तसेच शिक्षकांचा पोशाख खोळ नसावा.
केशरचना व देखभाल
 केसांची स्वच्छता, रचना, देखभाल पोशाखाइतकीच महत्त्वाची केसांची निगा, स्वच्छता नियमित हवी. केशकर्तन नियमित हवे. केशकर्तनात फॅशनचा अतिरेक टाळावा. सभ्यता, सोज्वळता, साधेपणा जपत सौंदर्य वाढवणारी केशरचना हवी. शिकवताना केसावर हात फिरवणे, बटा, झुलपे मागे करणे, मुरका मारणे टाळावे. आपले वय, देहयष्टी, चेहरेपट्टीचा विचार करून केशरचना ठरवणे श्रेयस्कर. केशरचनेत फॅन्सी वस्तू (क्लिप्स, बँडस्, बो) टाळावेत. त्यात निगा, नियंत्रणावर भर हवा. प्रदर्शन नको. 'मॉडेल' बनणे टाळावे. केस विंचरलेले, बसवलेले हवेत. तेल लावावे, पण ओघळ येणार नाही याची काळजी हवी. शिक्षकांनी रोज दाढी करणे आवश्यक (वाढवली नसेल तर!) प्रसन्नता या सर्वांतून झरते.
सौंदर्य प्रसाधने/आभूषणे
 भडक बेस, लिपस्टिक, आयब्रो टाळावेत. प्रसाधन सौंदर्य खुलवणारे हवे, पण खुणावणारे नको. दागिने अपवाद हवेत, अतिरेक नको. दागिने मण्या-धातूंची चकाकी, चकमकी चंचलता नको. लंकेची पार्वती नको अन् गौरी लक्ष्मी नको. साध्वी, सावित्री हवी. पुरुष देवानंद नको तसे केश्तो मुखर्जी, जॉनी वॉकर नकोत. ए. के. हंगल हवेत. नखे वाढवू, रंगवू नये. मेंदीचे हात, ग्लोज, स्कार्फ, उंच टाचाचे बूट, चप्पल्स टाळावेत. सँडल्स, स्लिपर्स, चप्पल्स ऐवजी बूट वापरावेत. त्यांचा वापर समयोचित हवा.
संलग्नके (Accessories)
 वर्गात जाताना शक्यतो पर्स, बॅग, ब्रीफकेस, मोबाईल्स नेऊ नये. वर्गात मोबाईल्सचा वापर निषिद्ध मानावा. वर्गात पर्स, बॅग उचकत बसू नये. शैक्षणिक साधने, खडू, डस्टर, रोलकॉल्स घेऊन वर्गात प्रवेश करावा.

नवे शिक्षण, नवे शिक्षक/१९०