पान:नवे शिक्षण, नवे शिक्षक (Nave Shikshan , Nave Shikshak).pdf/१९०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

समजावणे अपसूक पुढे सरकत राहायला हवे. बोलण्याचा आरोह, अवरोह, विरामात धक्के (Jerks) नसावेत, संथपणा, प्रवाहीपणा हवा. बोलताना देहबोली, अभिनयाचं भान हवे. वाचिक अभिनयाचे शिकवण्यात मोठे महत्त्व असतं. नकली, प्रसंगी आवाज काढण्याचे (mimicry) कौशल्य हवे. प्रसंगी गाता यावे, रागावताही व प्रेम करताही येणे आवश्यक. शिक्षक म्हणजे वाचिक किमयागार !शिक्षकाचं बोलणे, शिकवणे मन:पूर्वक हवे. शब्दांची निवड चपखल हवी, वाक्याची फेक भाल्यासारखी हवी. तेच ते शब्द वापरणे, वाक्यांची वारंवारिकता टाळावी. त्यामुळे शिकवणे विद्यार्थ्यांना कंटाळवाणे होते. शिकवण्यात पाल्हाळिकता, रवंथपणा नसावा. उदाहरणे अनेक नकोत. अलंकार, म्हणी, वाक्प्रचार बोलण्यात सहज यावेत. 'मी' शब्द टाळावा. 'आपण' संबोधनामुळे विद्यार्थी शिक्षकात सामील होतात. आज्ञार्थक बोलू नये (करा, लिहा, उठा) इच्छार्थक क्रियापदांचा (करू या, बोलू या, लिहू या इ.) वापर विद्यार्थ्यांना उत्स्फूर्त सहभागी भूमिका देतो. भाषा प्रदूषित नसावी. एकाच वाक्यात मराठी, हिंदी, इंग्रजी शब्दांचे मिश्रण नको. उदा. 'म्युझियममध्ये सर्वत्र सन्नाटा होता.' अशी वाक्ये नकोत. बोलताना चेहऱ्याचे हावभाव व आशय यात ताळमेळ हवा. चेहरा हसरा, बोलका हवा. अगोदर ऐका मग विचार करा. प्रतिसाद द्या. प्रतिक्रिया नसावी. स्मितहास्य, हास्य, सातमजली हसणे (ठहाका/Laugh) यातले अंतर, त्यांच्या सीमारेषा, ते वापरण्याचे तारतम्य शिक्षकात हवे. प्रश्न सहज विचारावेत. प्रश्नांच्या फैरी नकोत. प्रश्नातही मार्दव हवं. (How old are you?) आप कितने जवान हो ? आपले वय काय? एकच वाक्य तीन भाषेचे वैभव, मर्यादा, दोष दाखवते. त्याचं भान शिक्षकास हवे. विद्यार्थ्यांना हसू नका, त्यांना हसवा, सतत उपदेश नको. थोडे त्यांना स्वातंत्र द्या. बोलण्यात खाकरणे, खेकसणे, खर्ज, ढेकर, आवंढा, जांभई, शिंक, उचकी टाळण्याचा प्रयत्न करा. बसून शिकवू नका. सरळ उभे राहून विद्यार्थ्यांशी संवाद साधा. पाय, हात, पुढे, मागे करणे, ठेवणे टाळा.
पोशाख
 शिक्षक/शिक्षकांनी आपल्या पोशाखाबाबत नेहमी चोखंदळ, जागरूक असायला हवे. विद्यार्थी निष्पाप असले तरी त्यांचे निरीक्षण सूक्ष्म, संवेदी व अनुकरणशील असते, याचे भान हवे. शिक्षकांनी पोषाखाची निवड रोज विचारपूर्वक करायला हवी. वय, प्रसंग, ऋतु, हवामान, उत्सव, समारंभ या सर्वाचं प्रतिबिंब त्यांच्या पोषाखात हवे. पोशाखांचे रंग भडक, चकाकणारे,

नवे शिक्षण, नवे शिक्षक/१८९