पान:नवे शिक्षण, नवे शिक्षक (Nave Shikshan , Nave Shikshak).pdf/१८९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

व्यक्तिमत्त्वाचाच. शिक्षकाची देहयष्टी, देहबोली, पोषाख, केशरचना, बोलणे, वागणे, चेहऱ्याचा रखरखाव/देखभाल (मात्र सजावट नव्हे!) (मेक अप, दागदागिने, स्वच्छता, नखे, दाढी, केशरचना) लकबी (बोलण्या, लिहिण्या, वागण्याच्या) या सर्वांबद्दल सांगणे आवश्यकच नाही तर अनिवार्य वाटतं.
देहयष्टी
 शिक्षक उंचापुरा, सशक्त, प्रसन्न चेहऱ्याचा, शिडशिडीत हवा. त्याच्यामध्ये चपळता हवी. त्याच्या चालण्या, बोलण्यात गतिमानता हवी. त्याच्या खाण्या-पिण्याच्या, वागण्याच्या सवयी आदर्श व अनुकरणीय हव्यात. स्वच्छता, आरोग्य, याचे त्यास उपजत बाळकडू आणि वरदान हवे.
देहबोली
 शिक्षकाच्या व्यक्तिमत्त्वात देहबोलीचे महत्त्व असाधारण असते.शिक्षकाचे बोलणे, भाव व्यक्त करणे, विचार करणे, निरीक्षण, स्पर्श, डोळ्यांचे संकेत, शाबासकी देणे, प्रसंगी धाक-प्रसंगी आदर वाटणे, शिक्षकाची आकलन क्षमता, हावभाव, अभिनय, प्रगटीकरण, आवाजातील आरोह, अवरोह, दोन शब्द/वाक्यातील विराम, अवकाश (Pause) विद्यार्थ्यांना समजून घेणे, हात, पाय, शरीराच्या हालचाली, ठेवण, हस्तांदोलन इत्यादी गोष्टी शिक्षकांनी प्रशिक्षण घेऊन शिकण्यासारख्या आहेत. ऍलन आणि बार्बरा पीजचे जगप्रसिद्ध पुस्तक (The Definative Book of Body Language) आता मराठीतही 'देहबोलीविषयी सर्वकाही' (अनुवाद रोहिणी पेठे, मंजुल पब्लिशिंग हाउस) उपलब्ध आहे. ते अजून अभ्यासक्रमात का लावले नाही याचे आश्चर्य वाटते. देहबोलीचे शास्त्र आता इतके विकसित झाले आहे की तो अभ्यासक्रमात (डी. टी. एड./बी. एड. एम. एड.) समाविष्ट व्हायला हवा. शिक्षक देहबोलीवर संशोधन (पीएच. डी.) होणे अनिवार्य, शिक्षक-विद्यार्थ्यातील संवाद, नाते, प्रेम, आदर, काळजी, सुरक्षा सारं यातून विकसित होते.
बोलणे
 शिक्षकाच्या बोलण्यात नेमकेपणा, स्पष्टता हवी. बोलण्यापूर्वी आपणास नक्की काय सांगायचे, समजवायचे आहे, ते उच्चारणापूर्वी अवबोध पातळीवर (मनात) ते पक्के हवे. बोलण्यात सोपेपणा हवा. बोलण्याची गती धीमी हवी. आपण बोलतो ते समजते का याचा अंदाज घेत बोलणे, शिकवणे,

नवे शिक्षण, नवे शिक्षक/१८८