पान:नवे शिक्षण, नवे शिक्षक (Nave Shikshan , Nave Shikshak).pdf/१८४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

संदर्भात मला अमेरिकेतील मिसौरी नामक छोट्या राज्यात तिथल्या जेफरसन सिटीमधील राजधानीच्या ठिकाणी कार्यरत जी प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाची व्यवस्था व रचना आहे, ती समजून घेणे उद्बोधक वाटते.
 सर्वात प्राथमिक गोष्ट अशी की, तिथला शिक्षक निवडला जातो तो जात, धर्म, वंश, लिंग, वय, राष्ट्रीयत्व यापैकी कशाचाही विचार न करता केवळ त्याचे व्यक्तिमत्त्व, पात्रता, वृत्ती या निकषावर तो निवडला जातो हे विशेष. तो निवडत असताना त्यांनी आपल्या देशाची, प्रांताची गरज लक्षात घेऊन शिक्षकाची परिमाणे (standrds) निश्चित केली आहेत. ती परिमाणे दुसरे तिसरे काही नसून अपेक्षित शिक्षकाच्या त्या कसोट्या व क्षमता होत. त्यांचा आधार आहे प्रभावी अध्यापन कौशल्य, व्यक्तिमत्त्व, जीवनभर शिकण्याची ऊर्जा, जिज्ञासुपणा, निरंतर स्वत:ला अद्ययावत (Update) करण्याची जागरूकता, नवे ज्ञान व तंत्रज्ञानाची ओढ, प्रयोगशीलता, संशोधन वृत्ती, वक्तृत्व, अभिनयकुशलता, खिलाडू वृत्ती, समाजशीलता, विद्यार्थी प्रेम, कष्टाळूपणा इत्यादी. त्यामुळे कसोट्याच निवड निश्चित करतात. आपल्याकडे एके काळी एखादा शिक्षक चांगले शिकवतो म्हणून संस्था अधिक वेतन व सवलती देऊन शिक्षक घेतले, निवडले जायचे. आता काही सन्मान्य अपवाद वगळता जो संस्थेस अधिक देणगी देईल त्याची निवड सरस होत आहे. मग शिक्षक विकास होणार तरी कसा? आणि अपेक्षा तरी काय करणार? म्हणून शिक्षक निवडीची परिमाणे समजून घेणे आवश्यक आहे.
विषयज्ञान व अध्यापन पद्धती (Containt and Method)
 ही गोष्ट आपल्याकडे पाहिली जाते. मात्र पाळली जात नाही. विषय शिक्षकाचे त्या विषयाचे ज्ञान म्हणजे माहिती नव्हे, तर त्या विषयाचा व्यासंगपूर्ण अभ्यास व आकलन, म्हणजे मराठीचा शिक्षक उदाहरण म्हणून घेऊ. आपणाकडे पाहिले जाते की पदवी मराठीतील आहे का? आणि डीटी.एड./बी.एड.ला मराठी ही त्याची अध्यापन पद्धती होती का? या दोन्ही औपचारिक पात्रता होत. पहिले काय पाहिजे? तर त्याला मराठी भाषा व साहित्याचा इतिहास माहीत आहे का? मराठी साहित्याचे वाचन, मराठी भाषेत नुकताच प्रकाशित संकल्पना कोश, वाङ्मय कोश, मराठी भाषा (बोली कोश) त्याला माहीत आहे का? आणि आपल्या नित्य अध्ययन, अध्यापनात तो ते वापरतो का? पाठ्यपुस्तकातील वेचे ज्या पुस्तक, संग्रह, कादंबरी, नाटकातून घेतले असतील ती मूळ पुस्तके,

नवे शिक्षण, नवे शिक्षक/१८३