पान:नवे शिक्षण, नवे शिक्षक (Nave Shikshan , Nave Shikshak).pdf/१८३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शिक्षक विकासाच्या पाऊलखुणा


 आपल्याकडे शिक्षक विकासाकडे फारसे गांभीर्याने पाहिले जात नाही. त्यामुळे आपणाकडे शिक्षकांचा जाणीवपूर्वक विकास होताना दिसत नाही. मुख्य म्हणजे शिक्षक ही वृत्ती आहे, तो व्यवसाय नव्हे. आपणास त्यास औपचारिक साच्यात घातल्यामुळे वृत्ती विकासाचा अभाव जाणवतो. भारतात शिक्षकाची वरिष्ठता, वृत्ती आणि गुणांऐवजी व्यवसायामधील श्रेष्ठत्वावर आधारित आहे. हे श्रेष्ठत्वही शिक्षकाची शैक्षणिक पात्रता व व्यवसायातील त्याची अध्यापन वर्षे लक्षात घेऊन ठरवले जाते. कारखाना, कार्यालयात जिथे साचेबंद काम असते तिथे हे ठीक आहे. पण शिक्षणाच्या क्षेत्रात जिथे जिवंत मुला-माणसांशी संबंध येतो तिथे आपण शिक्षकाचे मूल्यमापन यंत्रवत रूक्षतेने करतो. यातून शिक्षक व्यवसायाबाबतची आपली अनास्थाच स्पष्ट होते. आपल्याकडे शिक्षक प्रशिक्षण संस्था व कार्यक्रमाकडे परिपाठ व कर्मकांड म्हणून पाहिले जात असल्याने मूळ मडकेच कच्चे राहते असे दिसते. शिक्षकांचे शिक्षण व प्रशिक्षण हे खरे तर नित्य प्रयोग, संशोधन केंद्री असायला हवे, पण तिथे वर्षानुवर्षे तीच अध्यापन पद्धती, साधने, अभ्यासक्रम, क्रमिक पुस्तके राहात असल्याने त्यात एक प्रकारचा निर्जीवपणा आला आहे. शिक्षक प्रशिक्षण संस्थांमध्ये पूर्व प्राथमिक ते विद्यापीठ स्तरीय शिक्षक घडवले जातात, पण तिथे सर्वेक्षण, प्रयोग, नवी रचना, तंत्र असा गोफ विणला जाताना दिसत नाही.
 दुसरीकडे प्रगत देशांत मात्र उमेदवार शिक्षकापासून ते ख्यातनाम शिक्षक होण्याच्या विकास कालखंडातील शिक्षकांचं बदलतं, विकसित व्यक्तिमत्व, क्षमता, वृत्तीविकास यांच्या आधारे प्रत्येक श्रेणीतील शिक्षकाचे स्वरूप, गुण, वैशिष्ट्ये यांचा नित्य अभ्यास व विचार होताना दिसतो. या

नवे शिक्षण, नवे शिक्षक/१८२