पान:नवे शिक्षण, नवे शिक्षक (Nave Shikshan , Nave Shikshak).pdf/१८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रतिमा, दृश्य इत्यादीचे संकलन करू शकतात. ती चित्रे, दृश्य, आपणास हवी तशी बनवू शकतात व त्यांच्या अध्यापनातील उपयोगाने आपले अध्यापन रंजक, आनंददायी बनवू शकतात. 'अशक्य ते शक्य करिता सायास' ही ओळ या साधनांच्या साहाय्याने शिक्षक खरी करून दाखवू शकतात. उदाहरणच द्यायचे झाले तर आपणाकडे एक म्हण आहे. 'बेडूक कितीही फुगला तरी बैल होऊ शकत नाही.' पण इंटरनेटवर असलेल्या चित्र विकासक, संपादन साधनांच्याद्वारे आपण बेडकाला बैलाएवढा व बैलाला बेडकाएवढा बनवू शकतो व वर्गात धमाल करू शकतो. चित्रांचे आकार बदलणे, रंग बदलणे, चित्र बदलणे, अशा गमतीशीर गोष्टी करू शकतो. ऍनिमेशन फिल्मस् हे शालेय शिक्षणातले आजचे प्रभावी साधन, आपण रचलेली गोष्ट ऍनिमेशन रूपात दृश्यमय सादर करू शकतो. कार्टूनची निर्मिती या साधनांतून करता येते. 'पिकनिक', 'युवर ओल्डपिक', 'राऊंडपिक' ही अशी काही साधने होत. 'गिफअप', 'गिफमेक', 'गिकर' द्वारे आपण ऍनिमेटेड चित्र, फिती, त्रिमितिक चित्रे बनवू शकतो. 'गुगल सर्च', 'मॉरक्यू फाइल्स', 'फ्यूपिक', 'ग्राफिक रिसोर्सेस' द्वारे ग्राफिक, आलेख, आशय दृश्य स्वरूपात प्रगट करणे आता शक्य झाले आहे. कल्पना मूर्त करण्याची शक्ती शिक्षकांना देणारी ही संसाधने अध्यापन समृद्ध करण्याचे वरदानच होय.
* दृक् -श्राव्य फिती (video Tapes)
 'गुगल एज्युकेशन', 'यू-ट्यूब' ही चित्रफिती पुरवणारी संकेतस्थळे सर्वसामान्यांना व शिक्षकांना माहीत असलेली ठिकाणे होत, पण त्यांना सशक्त व समर्थ पर्याय देणारी व केवळ शाळा, शिक्षक, विद्यार्थी यांच्यासाठी कार्यरत ८० संकेतस्थळे अशी आहेत की, ती अहोरात्र विविध विषय, घटक, पाठ्यक्रमाधारित दृक्-श्राव्य फिती प्रसारित, प्रकाशित करीत असतात. 'स्कूल ट्यूब', 'टीचर टीव्ही', 'टीचर ट्यूब', 'नेक्स्ट दिस्टा', 'संग फिल्म','ऍकॅडमिक अर्थ', 'डॉक्युमेंटरी हेवन' ही संसाधने तुम्हास 'हिस्ट्री चॅनल', 'नॅशनल जिऑग्राफी', 'ऍनिमल प्लॅनेट', 'बीबीसी', 'सीएनएन,' च्या गाजलेल्या फिल्मस्, वृत्तचित्रे, वार्तांकने उपलब्ध करून देतात. इतिहास, भूगोल, खगोलशास्त्र, जीवशास्त्र, वनस्पतीशास्त्र शिक्षकांसाठी हा खजिनाच.
* इन्फोग्राफिक्स
 सांख्यिकी माहिती आलेखाने सादर करणे, भूगोलाचे वेगवेगळे नकाशे (रस्ते, पठार, डोंगर, नद्या इ.) सपाट, साधे, रंगीत, उठावदार, त्रिमितिक

नवे शिक्षण, नवे शिक्षक/१८०